

केज: काही दिवसांपूर्वीपर्यंत कोरड्याठाक पडलेल्या मांजरा धरणाकडे चिंतेने पाहणाऱ्या बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता आनंदाची लकेर उमटली आहे. पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत अवघ्या काही तासांत मोठी वाढ झाली आहे.
आज सकाळी ९ वाजताच्या अहवालानुसार, जिल्ह्याची जीवनदायिनी समजले जाणारे मांजरा धरण ८२.७८% भरले असून, धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता केवळ ०.७२ मीटर पाणीपातळी शिल्लक आहे.
यावर्षी पावसाळा सुरू होऊनही धरणाच्या पाणीपातळीत अपेक्षित वाढ होत नसल्याने शेतकरी आणि सिंचनावर अवलंबून असलेले बागायतदार चिंतेत होते. १४ ऑगस्टपर्यंत धरणात केवळ ३६% जलसाठा शिल्लक होता, ज्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न गंभीर होण्याची भीती होती. मात्र, १४ आणि १५ ऑगस्टच्या मध्यरात्री पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसाने हे चित्र पूर्णपणे पालटले. या १२ तासांच्या पावसाने धरणाची पाणीपातळी ३६ टक्क्यांवरून थेट ८२.७८ टक्क्यांवर पोहोचली. धरणाच्या पाणीसाठ्यात झालेली ही अनपेक्षित आणि विक्रमी वाढ परिसरातील नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरली आहे. प्रशासनाकडून दर तीन तासांनी पाणीपातळीचे अद्ययावत आकडे जाहीर केले जात आहेत.
मांजरा प्रकल्प प्रशासनाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार धरणाची एकूण पातळी: ६४२.३७ मीटर, सध्याची पातळी: ६४१.६५ मीटर आणि पूर्ण भरण्यासाठी शिल्लक: ०.७२ मीटर यामध्ये एकूण साठवण क्षमता: २२४.०९३ दशलक्ष घनमीटर झाली आहे. सध्याचा उपयुक्त साठा: १९३.६१३ दशलक्ष घनमीटर तर पाण्याची आवक (प्रति सेकंद): ५.५६७ दशलक्ष घनमीटर आहे.
धरणात पाण्याची आवक वेगाने होत असल्याने ते लवकरच पूर्ण क्षमतेने भरेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मागील वर्षी (२०२२) १६ ऑक्टोबर रोजी धरण पूर्ण भरल्याने पाण्याचा विसर्ग करण्यासाठी चार दरवाजे उघडण्यात आले होते. यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या मध्यातच धरण काठोकाठ भरत आल्याने, लवकरच धरणाचे दरवाजे उघडून मांजरा नदीपात्रात पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला जाऊ शकतो. या पावसामुळे या तिन्ही जिल्ह्यांतील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा पुढील वर्षभराचा प्रश्न मिटला असून, सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे.