सामाजिक युवा कार्यकर्ते रोशन सरवदे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात अर्धनग्न आंदोलन केले  Pudhari
बीड

Kaij Protest | स्मशानभूमीच्या नोंदीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात अर्धनग्न आंदोलन

साळेगावातील बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीला संरक्षण भिंतीचीही मागणी

पुढारी वृत्तसेवा

Crematorium Land Record Protest Kaij Beed

केज : साळेगाव येथील बौद्ध समाजाच्या जुन्या स्मशानभूमीची महसूल अभिलेखात अधिकृत नोंद करावी तसेच स्मशानभूमीला संरक्षण भिंत उभारावी, या मागणीसाठी सामाजिक युवा कार्यकर्ते रोशन सरवदे यांनी सोमवारी ( दि. १०) ग्रामपंचायत कार्यालयात अर्धनग्न आंदोलन केले.

साळेगाव येथील बौद्ध समाजाच्या जुन्या स्मशानभूमीला संरक्षण भिंत नसल्याने भविष्यात अतिक्रमण होण्याची शक्यता असल्याचा दावा आंदोलकांनी केला. यामुळे समाजाच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक भावनांना ठेच पोहोचण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या मागण्यांसाठी मागील दोन वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे रोशन सरवदे यांनी सांगितले. स्मशानभूमीची महसूल अभिलेखात नोंद करून संरक्षण भिंत उभारण्याची मागणी वारंवार करूनही ठोस कार्यवाही न झाल्याने त्यांनी सोमवारी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालयात अर्धनग्न आंदोलन केले.

आंदोलनाची माहिती मिळताच प्रशासनातील संबंधित अधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकारी घटनास्थळी उपस्थित झाले. यावेळी सरपंच कैलास जाधव, महसूल मंडळ अधिकारी मस्के, ग्राम महसूल अधिकारी गाडे, भूमी अभिलेख विभागाचे राख, ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय गव्हाणे तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. पोलिस कर्मचारी पुरुषोत्तम शेप आणि किशोर गोरे यांनीही परिस्थितीवर लक्ष ठेवले.

दरम्यान, प्रशासनाच्या वतीने स्मशानभूमीच्या नोंदीसह संरक्षण भिंतीच्या मागणीबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन आंदोलकांना देण्यात आले. त्यानंतर आंदोलनाबाबत पुढील निर्णय घेण्यात आला.

या आंदोलनात रोशन सरवदे यांच्यासह त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT