केज बंदला व्यापारी, छोटे व्यावसायिक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला  Pudhari
बीड

Kaij Bandh | दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ केजमध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

बंदला व्यापारी, छोटे व्यावसायिक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शहरातील बहुतांश व्यवहार बंद ठेवले

पुढारी वृत्तसेवा

Delhi Student Protest

केज : दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुधवारी (दि. २३ जुलै) केज शहरात बंदचे आयोजन करण्यात आले. या बंदला व्यापारी, छोटे व्यावसायिक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शहरातील बहुतांश व्यवहार बंद ठेवले.

नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचे शांततापूर्ण आंदोलन सुरू होते. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा वंचित बहुजन आघाडीने तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या मते, विद्यार्थ्यांवर करण्यात आलेला लाठीचार्ज हा भारतीय लोकशाही, संविधान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गंभीर आघात असून, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संवाद साधण्याऐवजी त्यांच्यावर बलप्रयोग करणे अत्यंत निषेधार्ह आहे. या घटनेतून सरकारची दडपशाही वृत्ती दिसून येत असल्याचा आरोपही करण्यात आला. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार राज्यभर बंदचे आवाहन करण्यात आले.

केज येथे बाबासाहेब मस्के, धनराज सोनवणे, प्रा. बळीराम सोनवणे, अमोल हजारे, शरद धिवार, लिंबराज गायकवाड, प्रवीण मस्के यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला सहभागी झाल्या. त्यांनी शहरातून रॅली काढून व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने शहरातील अनेक दुकाने आणि व्यावसायिक आस्थापना दिवसभर बंद राहिल्या.

यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, लाठीचार्जचे आदेश देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांच्या सर्व न्याय्य मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. तसेच भविष्यात विद्यार्थ्यांवर अशा प्रकारचा दडपशाहीचा वापर होणार नाही, याची शासनाने हमी द्यावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT