Kidnapping  File Photo
बीड

Beed Kidnapping | केज तालुक्यात तीन जणांचे कथित अपहरण; पारधी समाजातील युवकावर अमानुष मारहाणीचा आरोप

केज पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Beed Kaij Alleged Kidnapping

केज : केज तालुक्यातील केवड येथील पारधी समाजातील एका २० वर्षीय युवकासह तिघांचे कथित अपहरण करून त्यांना अमानुष मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रावण महादेव काळे (वय २०, रा. केवड, ता. केज) हा ३१ जुलै रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्याचा आत्याचा मुलगा कृष्णा आणि बहीण पुनम यांच्यासह दुचाकीवरून केवडकडे जात होता. त्यावेळी पाठीमागून आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या कारने त्यांची दुचाकी अडविली. कारमधून उतरलेल्या धनराज संदीपान खांडेकर, रामचंद्र संदीपान खांडेकर, भावड्या हनुमंत कुरवडे आणि लहु तोंडे यांनी तिघांना कारमध्ये बसवून कोल्हेवाडी येथील डांगे वस्ती परिसरात नेल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, तेथे श्रावण काळे याच्याकडे त्याच्या नातेवाईकाने घेतलेल्या कथित ५० हजार रुपयांच्या व्यवहाराबाबत जाब विचारण्यात आला. त्यानंतर श्रावण याला ओल्या काठीने दोन्ही मांड्या, तळपाय, तळहात आणि कंबरेखाली मारहाण करण्यात आली. तसेच त्याला धारदार शस्त्राने मांडीवर जखमा केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

श्रावणला मारहाण करू नका, अशी विनंती करणाऱ्या कृष्णालाही काठीने मारहाण करण्यात आल्याचा तसेच पुनम हिलाही चापट-बुक्यांनी मारहाण केल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. यानंतर पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी श्रावण काळे यांनी ३ ऑगस्ट रोजी दिलेल्या फिर्यादीवरून धनराज संदीपान खांडेकर, रामचंद्र संदीपान खांडेकर, भावड्या हनुमंत कुरवडे आणि लहु तोंडे या चौघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल हनुमान मुंडे पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, जखमी युवक पारधी समाजातील असल्याने या प्रकरणात अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हा का नोंदविण्यात आला नाही, असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. मात्र, याबाबत पोलिसांकडून अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT