अप्पर तहसील कार्यालय Pudhari
बीड

Beed News | कडा येथे अखेर अप्पर तहसील कार्यालयाचा मार्ग मोकळा; शासनाची अधिसूचना प्रसिद्ध

७ जुलैपर्यंत सूचना व हरकती मागविल्या; कडा केंद्रस्थानी असल्याने नागरिकांची गैरसोय होणार दूर

पुढारी वृत्तसेवा

Kada Upper Tehsil Office

कडा : आष्टी तालुक्यातील कडा येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलत अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीला अखेर मूर्त स्वरूप येण्याची चिन्हे दिसू लागली असून परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. शासनाने प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालयाबाबत नागरिकांकडून सूचना व हरकती मागविल्या असून त्या सादर करण्यासाठी ७ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे.

भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण असलेल्या आष्टी तालुक्यातील अनेक गावांतील नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत होते. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा अपव्यय होत होता. कडा येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू झाल्यानंतर सातबारा उतारे, फेरफार, विविध दाखले, जात प्रमाणपत्रे, महसुली नोंदी आणि इतर प्रशासकीय कामांसाठी स्थानिक पातळीवरच सुविधा उपलब्ध होणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात कडा, धानोरा, दादेगाव, पिंपळा, दौलावडगाव आदी परिसरातील महसूल मंडळांचा समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन अधिक गतिमान होण्याबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ आणि जलद गतीने उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

७ जुलैपर्यंत हरकती व सूचना सादर करण्याची संधी

अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याबाबत नागरिकांना आपली मते, सूचना व हरकती नोंदविण्याची संधी देण्यात आली आहे. या संदर्भातील लेखी हरकती व सूचना उपविभागीय अधिकारी, पाटोदा यांच्या कार्यालयात ७ जुलैपर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत. प्राप्त हरकतींची छाननी करून त्यावर विचार केल्यानंतर शासन अंतिम अधिसूचना जारी करणार आहे. त्यामुळे संबंधित नागरिकांनी निर्धारित मुदतीत लेखी स्वरूपात आपली मते सादर करावीत, असे आवाहन उपविभागीय अधिकारी वसीमा शेख यांनी केले आहे.

कडासाठी ऐतिहासिक निर्णय

कडा परिसरासाठी अप्पर तहसील कार्यालयाची स्थापना हा ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी पूर्णत्वास जाणार असून महसूल विभागाच्या विविध कामांसाठी नागरिकांचा तालुक्याच्या ठिकाणी होणारा प्रवास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. परिणामी ग्रामीण भागातील प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि सुलभ होण्यास मदत मिळणार आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश

राज्य शासनाच्या नव्या धोरणाचा आधार घेत कडा ग्रामपंचायतीने अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्यासाठी महसूल विभागाकडे सविस्तर प्रस्ताव सादर केला होता. परिसरातील पाच महसूल मंडळांतील गावांची ही दीर्घकालीन समस्या सोडविण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मंत्रालयीन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. स्थानिक लोकप्रतिनिधींच्याही प्रयत्नांना यश मिळाल्यानंतर महसूल विभागाने कडा येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

आता १५ ते २० किलोमीटरचा प्रवास वाचणार

अप्पर तहसील कार्यालय सुरू झाल्यानंतर मराठवाड्याच्या सीमेवरील अनेक गावांतील नागरिकांना महसूल विभागाच्या कामांसाठी आष्टी येथे जाण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. सातबारा उतारे, फेरफार, विविध प्रमाणपत्रे आणि इतर महसुली कामे स्थानिक पातळीवरच होणार असल्याने नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम यांची मोठी बचत होईल. त्यामुळे या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.

दरम्यान, उपविभागीय अधिकारी वसीमा शेख यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार संबंधित महसूल मंडळे तसेच ग्राम महसूल अधिकारी सज्जा कार्यालयांमध्ये ही नोटीस दर्शनी भागात प्रसिद्ध करण्यात आली असून नागरिकांनी त्याची नोंद घेऊन मुदतीत हरकती अथवा सूचना सादर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT