Kada Dr Mahendra Patwa Case
कडा : १९ वर्षीय तरुणीने केलेल्या गैरवर्तनाच्या आरोपानंतर गुन्हा दाखल झालेल्या प्रकरणातील आरोपी डॉ. महेंद्र पटवा यांच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात नुकतेच ऑपरेशन करण्यात आले आहे. त्यानंतर ते अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, त्यांच्या अटकेच्या प्रक्रियेसाठी पोलिसांचे पथक रुग्णालयात दाखल झाल्याने या प्रकरणातील पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर डॉ. पटवा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास अधिकारी नंदकिशोर सवासे असून, पोलिसांकडून प्रकरणातील विविध बाबींची चौकशी सुरू आहे.
डॉ. पटवा यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाल्याने सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबतचा वैद्यकीय अहवाल तसेच डॉक्टरांचा सल्ला प्राप्त झाल्यानंतर अटकेसंदर्भात कायदेशीर प्रक्रिया पुढे नेली जाणार असल्याचे तपास अधिकारी नंदकिशोर सवासे यांनी सांगितले.
या प्रकरणामुळे कडा शहरात यापूर्वीच संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी ‘पटवा हटवा’च्या घोषणा देत कारवाईची मागणी केली होती. आता आरोपी रुग्णालयात उपचार घेत असताना अटकेसाठी पोलिसांचे पथक दाखल झाल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
आरोपी वैद्यकीयदृष्ट्या अटकेसाठी सक्षम आहेत की नाही, हे वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. त्यामुळे पोलिसांच्या पुढील कारवाईकडे कडा शहरासह आष्टी तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
१९ वर्षीय तरुणीने केलेल्या गैरवर्तनाच्या आरोपानंतर कडा शहरात ‘पटवा हटवा’ची मागणी जोर धरली होती. या पार्श्वभूमीवर श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाने डॉ. महेंद्र पटवा यांना कार्यकारी मंडळाच्या मानद मंत्री पदावरून हटविले. त्यानंतर कडा मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशननेही त्यांची उपाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली आहे.
नागरिकांच्या आंदोलनानंतर विविध संस्थांकडून करण्यात आलेल्या या कारवाईची शहरात चर्चा सुरू आहे.
डॉ. महेंद्र पटवा यांच्यावर उपचार सुरू असल्याने त्यांच्या अटकेबाबत पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वैद्यकीय अहवालानंतर ते अटकेसाठी सक्षम असल्याचे स्पष्ट झाल्यास कायदेशीर प्रक्रियेनुसार पुढील कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे आरोपीची अटक नेमकी कधी होणार, याची चर्चा सध्या कडा शहरात सुरू आहे.