Beed Jail Phone Service pudhari photo
बीड

Beed Jail Phone Service : कारागृहातील कैद्यांची फोन सेवा दीड महिन्यांपासून बंद

अत्याधुनिक यंत्रणा बसवणार; कॉन्फरन्स कॉल केल्यास फोन आपोआप होणार कट

पुढारी वृत्तसेवा

बीड : बीड जिल्हा कारागृहातील सर्वच कैद्यांची फोन सेवा गेल्या दीड महिन्यांपासून बंद आहे. कारागृहातील काही कैद्यांचे फोन कॉल्स रेकॉर्डिंग करून ते व्हायरल करण्याचे प्रकार घडल्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. आता या ठिकाणी अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित केली जात असून, यादरम्यान एखाद्या कैद्याने नातेवाईकाला फोन केल्यानंतर कॉन्फरन्स कॉल जोडण्याचा प्रयत्न केल्यास तो कॉल आपोआप कट होणार आहे.

बीड जिल्हा कारागृहात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडसह इतर आरोपी आणि विविध घोटाळ्यांतील संशयित आरोपी बंदिस्त आहेत. त्यामुळे हे कारागृह सतत चर्चेत रहते. काही दिवसांपूर्वी कारागृहात व्हीआयपी सुविधा मिळत असल्याच्या तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबितही करण्यात आले होते.

दरम्यान, खासदार बजरंग सोनवणे यांनी कारागृह महानिरीक्षकांना पत्र लिहून, वाल्मीक कराडने कारागृहातून माझ्या मुलाला अडकवण्याचा कट रचल्याप्रकरणी चौकशीची मागणी केली होती.

या सर्व पार्श्वभूमीवर कारागृह प्रशासनाने तक्रारीनंतर वरिष्ठ पथकांनी तपासणी केली होती, सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. यापूर्वी कारागृहातून कैद्यांनी फोन केल्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल झाल्याच्या प्रकारांची गंभीर दखल घेण्यात आली आहे. जुनी यंत्रणा कॉन्फरन्स कॉल रोखण्यास असमर्थ होती, मात्र आता नवीन अत्याधुनिक यंत्रणेमुळे अशा प्रकारांना आळा बसणार आहे.

कारागृहाला टँकरने पाणीपुरवठा

बीड जिल्हा कारागृहाला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते. मात्र, नगरपालिकेकडून पंधरा दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा होत असल्याने सध्या दररोज तीन ते चार टँकरच्या माध्यमातून कारागृहाला पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT