Beed honor killing criminal arrested
बीड, पुढारी वृत्तसेवा : स्वतःच्या बहिणीसह तिच्या प्रियकरावर हल्ला केल्याचे प्रकरण २०१४ मध्ये घडले होते. त्या प्रकरणात आरोपी सोनु काळवणे याला बहिणीच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती परंतु तो फरार झाला होता. त्याला बीड शहर पोलिसांनी गुरुवारी अटक केली.
फरार आरोपी विठ्ठल ऊर्फ सोनू प्रकाश काळवणे याच्या संदर्भात महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली आहे. काळवणे याच्यावर बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याने बहिणीच्या प्रेम प्रकरणाचा राग आल्याने तिच्यासह तिच्या प्रियकरावर कोयत्याने हल्ला केला होता. यात उपचारादरम्यान बहिणीचा मृत्यू झाला तर तिचा प्रियकर वाचला होता. ऑनर किलिंगचा हा प्रकार होता.
परंतु खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झालेला हा आरोपी गेल्या पाच वर्षांपासून फरार झालेला होता. पोलिसांचा ताबा चुकवून तो फरार झाल्याने याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांनी याबाबत जे गंभीर गुन्ह्यात फरार आरोपी आहेत त्यांना पकडण्याची मोहीम काढलेली आहे. या मोहिमेंतर्गत अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली १७ जुलै रोजी पोलिस ठाणे बीड शहरचे पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि महेश जाधव, पो.ह. गहिनीनाथ बावनकर, पो.अ. राम पवार या तपास पथकाने सतर्कपणे काम करत सदर फरारी आरोपी विठ्ठल ऊर्फ सोनू प्रकाश काळवणे यास शोधून ताब्यात घेतले आहे. सदर आरोपीस अटक करून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असून त्यास न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. या यशस्वी कारवाईबद्दल तपास पथकाचे व मार्गदर्शक अधिकाऱ्यांचे पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांनी अभिनंदन केले आहे.