Beed Manjara river flood
मनोज गव्हाणे
नेकनूर : शेतातील पिके अतिवृष्टीने उद्ध्वस्त झाली असून पिकांबरोबर नदीकाठच्या काळ्या सुपीक जमिनी खरडून गेल्याने दगड, मुरूम दिसून येत आहेत, तसा शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध सुटू लागला आहे. जमिनीकडे बघताच डोळे भरून येत असून झालेले नुकसान न भरून येणारे असल्याने शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग दाटले आहेत. सरकार शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मदत कधी करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दोन दिवस ओसरलेली मांजरा नदीची पाणी पातळी पुन्हा वाढू लागली आहे.
केज तालुक्यातील ग्रीन बेल्ट म्हणून ओळख असलेला मांजरा नदीचा पट्टा यावर्षी अतिवृष्टीमुळे होत्याचा नव्हता झाला. पावसाच्या संततधारेने नदीच्या पाण्याने नदीकाठची अर्धा, एक किलोमीटर जमीन कवेत घेतल्याने पिके तर गेलीच. शिवाय सुपीक जमिनीची वाताहात झाली. मागच्या दोन दिवसांतील कमी पावसाने पूरस्थिती ओसरताच उघडी पडलेली जमीन बघून बोरगाव बु. येथील शेतकऱ्यांचा अश्रूंचा बांध फुटला.
पिके उरली नाहीत, शिवाय जमिनीचा खडक दिसू लागला, हे चित्र खूप वेदनादायी असल्याचे शेतकरी दत्तात्रय रोठे यांनी 'दै. पुढारी'शी बोलताना सांगितले. पिकांबरोबर जमिनीचे झालेले नुकसान न भरून येणारे असल्याने शासनाने लवकरात लवकर मदत करून शेतकऱ्यांना यातून सावरावे, अशी मागणी होत आहे. बुधवार, गुरुवार पाऊस कमी होताच मांजरा नदीचे पाणी ओसरले होते. मात्र, शुक्रवारपासून पावसाने पुन्हा जोर धरल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे.