Beed Gevrai Cattle Rescue
गेवराई : आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अवैध गोवंश कत्तलीविरोधात गेवराई पोलिसांनी शनिवारी (दि.23) धडक कारवाई करत 14 गोवंशीय जनावरांची सुटका केली. या कारवाईत सुमारे 1 लाख 60 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात अवैध गोवंश कत्तलीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार गेवराईचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. साठेनगर परिसरातील सलमान मोहम्मद कुरेशी (वय २५) याने आपल्या ताब्यातील जागेत गोवंशीय जनावरे कत्तलीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या डांबून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे गेवराई पोलीस ठाण्याच्या पथकाने शनिवारी सकाळी छापा टाकला. कारवाईदरम्यान आरोपीच्या जागेत लहान-मोठी 14 गोवंशीय जनावरे दाटीवाटीने बांधून ठेवण्यात आल्याचे आढळले. जनावरांसाठी चारा व पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून सर्व जनावरे ताब्यात घेत त्यांची सुटका केली. अंदाजे 1 लाख 60 हजार 500 रुपये किमतीची ही जनावरे पुढील संगोपनासाठी गोशाळेत पाठविण्यात आली आहेत. आरोपी सलमान मोहम्मद कुरेशी याच्याविरुद्ध विविध कायदेशीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक किशोर पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जंजाळ, पोलीस उपनिरीक्षक राम खोत तसेच गेवराई पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.