Georai clash case FIR against 14 people
गेवराई: गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवारी झालेल्या गोंधळाप्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करत दोन्ही गटातील १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या आरोपींमध्ये ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांचाही समावेश आहे.
प्रा. हाके यांनी आमदार विजयसिंह पंडित व प्रकाशराव सोळंके यांच्याविरोधात केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला. या वक्तव्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी प्रा. हाके यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जाळून संताप व्यक्त केला. त्यावर हाके यांनी आव्हान देत “ज्या ठिकाणी माझा पुतळा जाळलात, त्याच ठिकाणी मी दुग्धाभिषेक करून चहा पिणार” अशी घोषणा केली.
या आव्हानामुळे सोमवारी चौकात मोठी गर्दी झाली. यावेळी आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांकडून हाके यांच्या अंगावर चप्पलफेक करण्यात आली. प्रत्युत्तरादाखल हाके समर्थकांनी गाड्यांवर चढून दांडके दाखवत आक्रमक पवित्रा घेतला. परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने पोलिसांनी तत्काळ लाठीचार्ज करून जमाव पांगवला व हाके यांना सुरक्षा कवच देत शहराबाहेर रवाना केले.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकाराची नोंद घेत सुमोटो गुन्हा दाखल केला असून, दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांसह प्रा. हाके यांच्यावर एकूण १४ जणांना आरोपी करण्यात आले आहे. सध्या शहरात शांततापूर्ण वातावरण असून चोख पोलीस बंदोबस्त तैनात आहे.