Maratha Protest kabaddi Mumbai Maratha Protest Update
सुभाष मुळे
गेवराई : मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर मराठा समाजाने विश्वास ठेवला आहे. त्यांच्या आंदोलनाला बीड जिल्ह्यातील ४ आमदार व एक खासदार यांनी पाठिंबा दिला आहे. मराठा समाज बांधवांनी आता वज्रमूठ आवळली असून दुसऱ्या दिवशीही ऊर्जा कायम राहिली आहे. आझाद मैदान खचाखच भरले आहे. रस्ते जाम झाल्याने भर रस्त्यावरच बीड जिल्ह्यातील आंदोलकांनी 'कबड्डी'चा खेळ मांडल्याचे चित्र समोर आले आहे.
महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा आरक्षणावर समाज बांधव एकवटल्याचे आज पहावयास मिळत आहे. बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे, गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित, माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर व आष्टी पाटोदा शिरूरचे आमदार सुरेश धस यांच्यासह बीड जिल्ह्यातील समाज बांधवांनी मुंबई गाठली. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखोंचा जनसमुदाय एकत्रित आल्याने प्रशासनाची दमछाक झाली. मैदानावर जागा नसल्याने बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथील मराठा आंदोलकांनी भर रस्त्यावरच 'कबड्डी'चा खेळ मांडला.
मराठा आंदोलकांना सरकार कितीही अडथळे आणो, आंदोलकांचा जोश कमी होत नाही. मुंबई महापालिका समोरच गेवराई तालुक्यातील सिरसदेवी आंदोलकांनी आज मैदान सजवलं आणि थेट कबड्डीचा खेळ मांडला. त्यामुळे आंदोलनाची ऊर्जा, जोश आणि खेळकरपणा पाहून मुंबईकर थक्क झाले. हीच खरी मराठा ताकद, लढा आणि खेळ दोन्ही एकाच वेळी हे देखील मुंबईकरांना पहावयास मिळाले.