बीडमध्ये इंधन टंचाई की संगनमताचा खेळ? pudhari photo
बीड

Beed fuel shortage : बीडमध्ये इंधन टंचाई की संगनमताचा खेळ?

जनतेला नकार, बॅरलला होकार; जिल्हा पुरवठा विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

नेकनूर : बीड जिल्ह्यात सध्या जाणवत असलेली इंधन टंचाई ही नैसर्गिक नसून ‌‘कृत्रिम‌’ असल्याचा गंभीर आरोप होत आहे. नेकनूरसह परिसरातील पेट्रोल पंपांवर सुरू असलेल्या मनमानी कारभारामुळे वाहनचालक, शेतकरी आणि व्यापारी हैराण झाले असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नेकनूर परिसरात विविध कंपन्यांचे चार पेट्रोल पंप असतानाही ग्राहकांना इंधनासाठी तीन ते चार तास उन्हात रांगा लावाव्या लागत आहेत. पंपांवर सावली आणि पिण्याच्या पाण्यासारख्या अत्यावश्यक सुविधांचा अभाव असल्याने महिला, मुले आणि ज्येष्ठांचे हाल होत आहेत. मात्र, या परिस्थितीकडे पुरवठा विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

सर्वसामान्य वाहनधारकांना इंधन नाकारले जात असताना, मध्यरात्री मोठ्या कॅन आणि बॅरलमध्ये जादा दराने इंधन विक्री होत असल्याचा गंभीर आरोप होत आहे. या प्रकाराला जिल्हा पुरवठा विभागातील काही अधिकारी-कर्मचाऱ्यांचा आशीर्वाद असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेले देखरेख पथक नेमके काय करत आहे, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

राजकीय स्तरावर हालचाली

या प्रकरणाची दखल घेत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी संपर्क साधून जिल्हाधिकाऱ्यांना योग्य सूचना देण्याची मागणी केली आहे. तसेच भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी या परिस्थितीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचे सांगितले.

पंपचालकांची मनमानी

काही पंपचालकांकडून उघडपणे मनमानी सुरू असल्याचे नागरिक सांगतात. कधी ‌‘फक्त वाहनांना इंधन‌’ असा नियम लावला जातो, तर कधी बॅरल आणि बाटल्यांमध्ये खुलेआम इंधन दिले जाते. पंपावर दोन-तीन मशिन उपलब्ध असतानाही केवळ एकाच मशिनवरून वितरण करून कृत्रिम गर्दी निर्माण केली जात असल्याचा आरोप ग्राहक करत आहेत. इंधन दरवाढीच्या अफवेमुळे साठा असूनही विक्री बंद ठेवली जात असल्याची चर्चा आहे.

जिल्ह्यात दोन दिवसात इंधन तुटवडा दूर होईल : विवेक जॉन्सन

बीड जिल्ह्यात मागील चार दिवसा पासून इंधन तुटवडा भासत असून दरवाढ मुळे कंपन्या ह्या पुरवठा करत नव्हत्या मात्र आता यावर तोडगा निघाला असून कंपन्यांशी बोलणे झाले असून दोन दिवसात सर्वकाही सुरळीत होईल असे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दैनिक पुढारी शी बोलताना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT