कडा : अतिवृष्टीने पिके उध्वस्त झाली,शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले. पण शासनाची मदत मात्र अजूनही मार्गातच अडकली आहे! दोन महिन्यांहून अधिक काळ उलटून गेला तरी हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी अखेर बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांचा ताफाच अडवला.
आष्टी तालुक्यातील देवळाली आणि घाटा पिंपरी परिसरात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सकाळी साडे अकरा वाजता केंद्रीय पथक आले होते. घाटा येथील पाहणी संपल्यानंतर पथक देवळालीत गेले.दरम्यान, बीडकडे परतत असलेले जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचा ताफा माळीमळा येथे आल्यानंतर शेतकऱ्यांनी रस्ता रोखून धरला."नुकसानभरपाई देताना दुजाभाव का? काहींना मदत, काहीं बेदखल का?"असा सवाल करत शेतकऱ्यांनी प्रशासनाला केला.
जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्नांचा भडिमार करत शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.या गोंधळात जिल्हाधिकारी काहीसे संतप्त झाल्याचे दिसून आले. दरम्यान,तहसीलदार वैशाली पाटील यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती शांत केली. आम्ही नुकसानीची पाहणी करण्यासाठीच जात आहोत, असे सांगून त्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढल्यानंतर ताफा पुढे रवाना झाला.