कडा : आष्टी तालुक्यात वन्यप्राण्यांच्या वावराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. देवळाली (लोखंडी) शिवारातील सोनी पठार परिसरात वन्यप्राण्याने केलेल्या भीषण हल्ल्यात एका शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. गुरांसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या देविदास माणिक टकले (वय ४०, रा. देवळाली) यांच्यावर शनिवारी (दि.७) सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास अचानक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला. शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चारा आणण्यासाठी गेले अन् काळाने घाला घातला!
मिळालेल्या माहितीनुसार, देवळाली-लोखंडवाडी परिसरातील सोनी पठार भागात देविदास टकले हे शनिवारी सकाळी गुरांसाठी चारा आणण्याकरिता गेले होते. याचवेळी दबा धरून बसलेल्या वन्यप्राण्याने त्यांच्यावर अचानक झडप घातली. हल्ला इतका भीषण होता की, त्यांना सुमारे १०० ते १५० फूट फरफटत नेल्याची माहिती समोर आली आहे. या जीवघेण्या हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला. रोजच्या उदरनिर्वाहासाठी आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्याचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
बिबट्या की वाघ? वनविभागासमोर ओळख पटविण्याचे आव्हान!
या हल्ल्यामागे नेमका कोणता वन्यप्राणी आहे, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टता झालेली नाही. हा हल्ला बिबट्याने केला की वाघाने, याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यामुळे वनविभागाने घटनास्थळावरील पुरावे, पायांचे ठसे आणि इतर निरीक्षणांच्या आधारे हल्लेखोर वन्यप्राण्याची ओळख निश्चित करणे गरजेचे आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी धामणगाव येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आला असून, वनविभागाकडून पुढील तपास सुरू आहे.
शेतकऱ्यांनी शेतात जायचे तरी कसे?
आधीच दुष्काळी परिस्थिती, जनावरांच्या चाऱ्याची टंचाई आणि शेतीसमोरील संकटे यामुळे शेतकरी त्रस्त आहेत.त्यात आता वन्यप्राण्यांच्या हल्ल्याची भीती निर्माण झाल्याने शेतात जाणेही धोकादायक बनले आहे. देवळाली,लोखंडवाडी आणि सोनी पठार परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.
वन्यप्राण्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभाग नेमकी कोणती पावले उचलणार? परिसरात गस्त वाढविणार का? नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना होणार का? असे सवाल उपस्थित होत आहेत. केवळ पंचनामा आणि पाहणीपुरती कारवाई न करता वनविभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.