Eknath Shinde Support Banners pudhari photo
बीड

Beed Political News : बीडमध्ये एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ बॅनरबाजी

'शिंदे साहेब, तुमचं जरा चुकलंच... चार राजकीय सर्टिफिकेटसाठी तुमचा बाजार उठवतो, ही भाषा?, मनोज जरांगे यांच्या टीकेला शिंदे समर्थकांकडून प्रत्युत्तर

पुढारी वृत्तसेवा

बीड: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधल्यानंतर आता बीड शहरात शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर्स झळकले आहेत. 'शिंदे साहेब, तुमचं जरा चुकलंच... चार राजकीय सर्टिफिकेटसाठी तुमचा बाजार उठवतो, ही भाषा?' असा सवाल उपस्थित करत या बॅनर्समधून जरांगे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात आले आहे. त्यामुळे बीडमधील राजकीय वातावरणात या बॅनर्सची चर्चा रंगली आहे.

या बॅनर्सवर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करण्यात आला आहे. मराठवाड्यात गेल्या 40 वर्षांत केवळ दोन हजार कुणबी प्रमाणपत्रे मिळाली होती; मात्र शिंदे यांनी दोन वर्षात साडेतीन लाख प्रमाणपत्रे मिळवून दिल्याचा दावा बॅनरवर करण्यात आला आहे. या कामाचा उल्लेख करत 'शिंदे साहेब, तुमचं जरा चुकलंच!' असा उपरोधिक टोला लगावण्यात आला आहे.

मराठा समाजाला 10 टक्के एसईबीसी आरक्षण देण्याचा निर्णय आणि मराठवाड्यातील साडेतीन लाख विद्यार्थ्यांनी या आरक्षणाचा लाभ घेतल्याचा दावाही बॅनर्सवर करण्यात आला आहे. तसेच मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी देण्यात आल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे.

'एवढं करूनही शिंदे साहेब, खरंच तुमचं चुकलं !' अशा उपरोधिक शब्दांत शिंदे यांच्या कामांचा दाखला देत टीकाकारांना सवाल करण्यातआला आहे. जरांगे पाटील यांनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर हे बॅनर्स लावण्यात आल्याने मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि त्यावरून सुरू असलेले राजकीय आरोप-प्रत्यारोप पुन्हा चर्चेत आले आहेत.

दरम्यान, या बॅनर्सवरून बीडमध्ये राजकीय चर्चाना उधाण आले असून, शिंदे यांच्या समर्थनार्थ मांडण्यात आलेली ही भूमिका आता लक्षवेधी ठरत आहे. व्यक्त दसरा मेळाव्यात जरांगे पाटील यांनी शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी होत आहे. शिंदे यांच्याविरोधात करण्यात आलेले आरोप चुकीचे असून, ते शिवसैनिक सहन करणार नाहीत, अशी भूमिका उद्धव मडके यांनी मांडली. 'एकनाथ शिंदे यांच्यावरील आरोप सिद्ध करा, अन्यथा तोंडाला काळे फासू,' असा थेट इशारा मडके यांनी दिल्याने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांना आता राजकीय संघर्षाचे स्वरूप येण्याची शक्यता आहे.

जरांगेंनी आरोप सिद्ध करावेत; अन्यथा तोड काळे करू !

नारायणगड येथे झालेल्या दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर बीड जिल्ह्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यावरील आरोप सिद्ध करा, अन्यथा मनोज जरांगे पाटील यांच्या तोंडाला काळे फासू, असा इशारा शिवसेनेचे गेवराई तालुकाप्रमुख उद्धव मडके यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT