बीड

Beed | दुष्काळात 'रोहयो' मजुरांना काम मिळण्यात अडथळे

लोहारा : जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

कालिदास गोरे

लोहारा : राज्यातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. खरीप पिकांचे नुकसान झाल्याने ग्रामीण भागातील रोजगाराचे स्रोत कमी झाले आहेत. अशा परिस्थितीत रोजगार हमी योजनेतील जाचक अटी शिथिल करून कामे तातडीने सुरू करावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

दुष्काळी परिस्थितीत जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देण्याचे आवाहन शासनाकडून केले जात आहे. मात्र, कामे सुरू करताना विविध प्रशासकीय प्रक्रिया आणि अटींमुळे अडचणी येत असल्याचे सांगण्यात येते. विशेषतः प्रत्येक कामावरील मजुरांचे दररोज फोटो काढणे, उपस्थिती नोंदविणे आणि कागदपत्रांची पूर्तता करणे ही कामे ग्रामरोजगार सेवकांसाठी आव्हानात्मक ठरत आहेत.

एखाद्या गावात अनेक कामे एकाच वेळी सुरू असल्यास प्रत्येक ठिकाणी जाऊन मजुरांचे फोटो घेणे आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडणे कठीण होते. त्यामुळे या प्रक्रियेत व्यवहार्य पर्याय उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी होत आहे.

मजुरांना तातडीने काम द्या

ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे मजुरीवर अवलंबून आहेत. शेतीतून उत्पन्न मिळत नसल्याने रोजगार हमीच्या कामांची त्यांना प्रतीक्षा आहे. त्यामुळे कामांची मंजुरी, मजुरांची नोंदणी आणि उपस्थितीच्या प्रक्रियेत सुलभता आणून पात्र मजुरांना वेळेत काम उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांची बैठक घेऊन अडचणींचा आढावा घ्यावा, आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे आणि गावागावांत रोजगार हमीची कामे सुरू करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन नियमानुसार शक्य असलेल्या अटी शिथिल करून मजुरांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT