बीड ः बीड जिल्ह्यातील सहा नगरपालिकांसाठी मतदान पार पडले होते, यानंतर आज दि.21 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन दुपारी बारा वाजेपर्यंत निकाल हाती येऊ शकतात. बीडसह गेवराई, परळी, अंबाजागाई, धारुर, माजलगाव या नगरपालिकांचे कारभारी आज ठरणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बीड जिल्ह्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या बीडसह माजलगाव, परळी, अंबाजोगाई, गेवराई व धारूर या नगरपालिकांच्या निवडणूका पार पडल्या. यामध्ये पालकमंत्री अजित पवार, मंत्री पंकजा मुंडे, आ.धनंजय मुंडे, आ.विजयसिंह पंडित, आ.संदिप क्षीरसागर, आ. प्रकाश सोळंके, आ.नमिता मुंदडा, यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
विशेषतः बीड नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांच्या दोन सभा घेण्यात आल्या होत्या. एव्हढी पाच वर्ष संधी द्या असे आवाहन करत अजित पवारांनी बीडच्या विकासाचा वादा केलेला आहे, तर दुसरीकडे ऐन निवडणूकीत मोठा डाव टाकत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी डॉ.योगेश क्षीरसागर यांना भाजपात प्रवेश देत मोठे आव्हान या निवडणूकीत उभा केले. तर आ.संदिप क्षीरसागर यांनी देखील या निवडणूकीत पूर्णपणे झोकून देत प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे.
याबरोबरच एमआयएमचे ॲड. शेख शफ ीक यांनी आपली ताकद या निवडणूकीच्या माध्यमातून दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत. बीडचे मतदार कोणाला कौल देतात, हे दुपारी बारा वाजेपर्यंत कळणार आहे.