Case registered Pudhari File Photo
बीड

Beed crime : उस्मानिया फाउंडेशनच्या नावावर स्वतःचा खिसा भरला; ३ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

Usmania Foundation fraud: माजलगाव शहरातील काही तरुणांनी गरीब लोकांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने 'उस्मानिया फाउंडेशन' ही संस्था स्थापन केली होती

पुढारी वृत्तसेवा

माजलगाव : माजलगाव शहरात उस्मानिया फाउंडेशनच्या नावावर गरिबांच्या मदतीसाठी जमा केलेल्या देणगीची रक्कम फाउंडेशनच्या अधिकृत खात्यात न जमा करता, स्वतःच्या खात्यात घेऊन फसवणूक केली. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या एटीएस (दहशतवाद विरोधी पथक) पथकाच्या चौकशीनंतर माजलगावातील फुलेनगर येथील तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

घटनेची सविस्तर माहिती

माजलगाव शहरातील काही तरुणांनी गरीब लोकांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने 'उस्मानिया फाउंडेशन' ही संस्था स्थापन केली होती. या संस्थेच्या माध्यमातून गरिबांना मदत करण्यासाठी लोकांकडून लाखो रुपयांची देणगी गोळा करण्यात आली. मात्र, या फाऊंडेशनमधील आलिम खिजर सय्यद, हसन शेख रशीद आणि हनीफ नईम शेख या तीन पदाधिकाऱ्यांनी फाउंडेशनसाठी आलेली रक्कम अधिकृत खात्यात न घेता, स्वतःच्या बँक खात्यावर क्यूआर कोडच्या (QR Code) साहाय्याने जमा करून या रकमेचा घोटाळा केल्याचे इतर सदस्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाची माहिती छत्रपती संभाजीनगर येथील दहशतवादी विरोधी पथकाला (ATS) दिली.

ATS पथकाचा तपास व गुन्हा दाखल

एटीएस पथकाने या प्रकरणाचा सखोल तपास केला असता, गोळा केलेली ही रक्कम देशविरोधी किंवा दहशतवादी कारवायांसाठी वापरली गेली आहे का, असा संशय निर्माण झाला होता. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता, दहशतवाद विरोधी पथक छत्रपती संभाजीनगरचे मोहम्मद मोसिन यांनी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, फुलेनगर, माजलगाव येथील राहणारे आलिम खिजर सय्यद, हसन शेख रशीद आणि हनीफ नईम शेख यांच्याविरोधात माजलगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(२), ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलम ६६(ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. गुन्ह्याचा पुढील तपास माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय डोने करत आहेत.

शहरात चर्चेला उधाण

दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) या प्रकरणात हस्तक्षेप केल्यामुळे, फाउंडेशनच्या नावावर जमा केलेला पैसा देशविरोधी कारवाया किंवा एखाद्या आतंकवादी संघटनेला तर पुरवला गेला नाही ना? या शंकेवरून माजलगाव शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT