

Gevrai Minor Girl Molestation Case
गेवराई : गेवराई तालुक्यातील एका आठवडी बाजारात अल्पवयीन मुलीची छेड काढल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलीच्या मामावर तसेच तिच्यासोबत असलेल्या नातेवाईक महिलेवर चौघांनी हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात चार अज्ञात आरोपींविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेवराई तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी आपल्या नातेवाईक मुलीसह आठवडी बाजारात आली होती. यावेळी चार अज्ञात युवकांनी तिचा पाठलाग करून वाईट हेतूने तिची छेड काढली. मुलीने प्रसंगावधान राखत त्यांच्यापासून स्वतःची सुटका केली.
यानंतर पीडित मुलगी व तिचे नातेवाईक रिक्षाने गावाकडे निघाले असता, आरोपींनी रिक्षाचा रस्ता अडवून पुन्हा मुलीची छेड काढली. यावेळी मुलीच्या मामाने व रिक्षाचालकाने आरोपींना जाब विचारला असता आरोपींनी काठी व लोखंडी गजाने हल्ला करून दोघांना मारहाण केली. तसेच जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेत दोघेजण जखमी झाले असून पीडितेच्या तक्रारीवरून चार अज्ञात आरोपींविरुद्ध बीएनएस, पोक्सो अधिनियम तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गेवराई पोलीस करीत आहेत.