गौतम बचुटे
केज : महसूल विभागात लिपिक/महसूल सहाय्यक या पदाची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून मामाने त्याच्या सख्या भाच्याला, न्यायालयात लिपिक पदावर कार्यरत असलेल्या मामाने १९ लाख रुपयाला गंडविल्याचा प्रकार केज तालुक्यात घडला आहे. या प्रकरणी मामा विरुद्ध केज पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल दाखल झाला आहे.
बीड जिल्ह्यातील तांबवा (ता. केज) येथील अमोल मधुकर चिगुरे या तरुणाचे सख्खे मामा (आईचा भाऊ) दगडू विठ्ठलराव हंगरगे (रा. माऊली नगर, जलालपूर रोड, परळी वैजनाथ, ह. मु. पालम, जि. परभणी) हे परभणीच्या जिल्हा व सत्र न्यायालयात लिपिक पदावर कार्यरत आहेत. या मामाने आपला भाचा अमोल चिगुरे यास विश्वासात घेऊन महसूल विभागात लिपिक/महसूल सहाय्यक या पदाची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यासाठी १९ लाख रुपयांची मागणी केली. त्या नुसार अमोल चिगुरे याने ७ जून २०२२ व ५ जुलै २०२२ रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या केज शाखेतून ऑनलाईन आरटीजीएस द्वारे आणि ८ जानेवारी २०२३ रोजी घरी असे एकूण १९ लाख रुपये मामा दगडू हंगरगे यांना दिले.
हे पैसे देऊन सुद्धा तीन वर्षापासून नोकरी लागत नसल्याने, त्याने मामाला विचारणा केली असता त्याने खोटे आश्वासन देत फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अमोल चिगुरे याने त्याचे मामा दगडू हंगरगे यांच्याकडे पैसे परत देण्याची मागणी करून देखील तो पैसे परत देत नसल्याने (दि. १७ जुलै) रोजी त्याने केज पोलिस ठाण्यात दगडू हंगरगे याच्या विरुद्ध दिलेल्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ४५३/२०२६ भा. दं. वि. ४२०, ४०६, ४६८, ४७१ नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम हे तपास करीत आहेत.