केज : रात्री शेतात नागंरणी करीत असलेल्या ट्रॅकर चालकाला तीन अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने मारहाण करून अंधाराचा फायदा घेवून ते मोटार सायकलीवरून पसार झाले. यामुळे परिसरात दहशत पसरली आहे.
दि. ८ मे रोजी पवनकुमार सतीष काचुळे हा साळेगाव शिवारात ज्ञानेश्वर इंगळे हा शेतात ट्रॅक्टरने नांगरणी करीत असताना रात्री १०:४५ वाजताच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्ती दोन मोटार सायकलवरून आल्या. त्यांनी पवनकुमार काचुळे याला धारदार शस्त्राने आणि गजाने मारहाण केली. अचानक झालेल्या हल्ल्याने पवनकुमार ओरडल्यानंतर हल्लेखोर दोन मोटार सायकली वरून साळेगावच्या दिशेने पळून गेले. या हल्ल्यात पवनकुमार काचुळे यांच्या डाव्या हाताला सात टाके पडले असून पाठीला मार लागला आहे. या प्रकरणी तीन अज्ञात व्यक्तींविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
या घटनेमुळे शेतकरी आणि शेतात नांगरणी करणाऱ्या ट्रॅक्टर चालक यांच्यात भितीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी हल्लेखोर बूट आणि चप्पल सोडून पळाले. पवनकुमार काचुळे याच्यावर हल्ला केल्यानंतर तिघे हल्लेखोर हे पळून जात असताना एकाच्या पायातील पांढऱ्या रंगाचे स्पोर्ट शूज आणि एक चप्पल घटनास्थळी आढळून आली आहे.