Wife murders husband over family dispute.
गेवराई, पुढारी वृत्तसेवा : कौटुंबिक वादातून पत्नीनेच बहीण व मेहुण्याच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना तब्बल आठ महिन्यांनंतर उघडकीस आली आहे. गेवराई पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत या प्रकरणाचा छडा लावला असून, तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव तुकाराम शिंदे (वय ५०) व त्यांची पत्नी संगीता शिंदे हे सप्टेंबर २०२५ दरम्यान पुण्याहून दुचाकीवरून गेवराई तालुक्यात्तील पांढरवाडी येथे नातेवाईक सविता व विष्णू वाजे यांच्याकडे आले होते. कौटुंबिक वादातून उद्धव शिंदे हे पत्नीला सतत त्रास देत असल्याने दि. ६ सप्टेंबर रोजी पुन्हा वाद झाला. या वादातून संतापलेल्या संगीता शिंदे हिने बहीण सविता वाजे व मेहुणे विष्णू वाजे यांच्या मदतीने उद्धव शिंदे यांचा गळा आवळून खून केला.
खून केल्यानंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. विष्णू वाजे याने दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने मृतदेह जवळील ऊसाच्या शेतात टाकला. काही दिवसांनी दुर्गंधी येऊ लागल्याने मृतदेह गोणीत भरून मोटारसायकलवरून शहागड येथील जुन्या पुलावरून गोदावरी नदीत फेकण्यात आला. त्यानंतर मृताची मोटारसायकलही त्याच ठिकाणी नदीपात्रात टाकण्यात आली.
या प्रकरणी शुभम शिंदे यांच्या तक्रारीवरून गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक लंके करीत आहेत. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार, सपोनि दीपक लंके, सपोनि संतोष जंजाळ, अण्णासाहेब पवार व पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, कौटुंबिक वादातून घडलेल्या या क्रूर कृत्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
मिसिंगची तक्रार ठरली बनाव
दरम्यान, मुख्य आरोपी संगीता शिंदे हिने पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याची खोटी तक्रार दाखल केली होती. मात्र, दि. २ मे २०२६ रोजी मृताचा मुलगा शुभम शिंदे याने वडिलांच्या वेपत्ता होण्याबाबत घातपाताची शंका व्यक्त केल्याने प्रकरणाला कलाटणी मिळाली. गेवराई पोलिसांनी संशयित सविता व विष्णू वाजे यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर मुख्य आरोपी संगीता शिंदे हिला पुणे पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली.