Beed Crime News: Man who assaulted a minor girl sentenced to ten years in prison
बीड, पुढारी वृत्तसेवा: अल्पवयीन मुलीवर बळजबरीने लगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी सर्फराज रशिद सय्यद (रा. इस्लामपुरा, पेठ बीड) यास बीड जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच आरोपीस ९ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास ९ महिने साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.
ही घटना दिनांक २६ मे २०२१ रोजी घडली होती. पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फूस लावली व घरातून पळून जाण्यास भाग पाडले. त्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले, अशी फिर्याद पेठ बीड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधान व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा २०१२ मधील कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. प्रकरणाची सुनावणी अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ तथा विशेष न्यायाधीश व्ही.एच. पाटवदकर यांच्या न्यायालयात झाली. सरकारी पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले.