Beed Crime News: A tipper truck transporting gravel was seized at Hol
केज, पुढारी वृत्तसेवा : अवैधरित्या मुरूम उत्खनन करून वाहतूक करणारे टिप्पर मुरुमासह होळ (ता. केज) येथे अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे यांनी बुधवारी दुपारी पकडले. महसूल अधिकाऱ्यांनी हे टिप्पर आणून तहसील कार्यालयात लावले असून टिप्पर मालकास दोन लाख ५० हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. अशी माहिती तहसीलदार राकेश गिड्डे यांनी दिली.
अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे हे प्रशासकीय कामानिमित्त बुधवारी दुपारी केजला तहसील कार्यालयात येत होते. होळ येथून येत असताना वाटेत मुरूम भरून चाललेले टिप्पर (ओ. डी. १० वी ८९४८) त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी टिप्पर चालकास टिप्पर थांबण्यास सांगितले.
त्यानंतर टिप्परमध्ये मुरूम आढळून आल्याने त्यांनी सदरचे टिप्पर हे ताब्यात घेण्याचे आदेश दिले. तहसीलदार राकेश गिड्डे यांनी तलाठी, मंडळ अधिकऱ्यांसह जाऊन मुरुमाचे टिप्पर ताब्यात घेऊन तहसील कार्यालयात आणून लावले.
दरम्यान, टिप्पर चालक आणि मालकाने कुठल्याही प्रकारची रॉयल्टी न भरता अवैधरित्या मुरूम उत्खनन करून मुरूम भरून वाहतुक केल्याचे स्पष्ट झाल्याने संबंधित टिप्पर मालकास दोन लाख ५० हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. संबंधित टिप्पर मालक चनई (ता. अंबाजोगाई) येथील असल्याचे चालकाने सांगितले.