बीड ः शहरातील पेठबीड भागात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून तिची छेड काढली. मुलीने या प्रकाराला विरोध करताच तिला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या प्रकरणी पेठबीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकबर कुरेशी (रा.इंडिया मेडीकल जवळ, गांधीनगर, बीड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. शहरातील पेठबीड भागातील एक अल्पवयीन मुलगी शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तिच्या बहिणीसोबत गाडीवरुन टायपिंग क्लासला जात होती. यावेळी गांधीनगर भागात राहणारा अकबर कुरेशी हा तरुण तिचा दुचाकीवरुन पाठलाग करत होता.
काही अंतरावर त्याने आपली दुचाकी या मुलीच्या दुचाकीसमोर उभा केली व तिचा हात धरला. या प्रकारास मुलीने विरोध करताच अकबर याने मुलीला चापट मारली यानंतर मुलीने आरडाओरड करताच जवळच असलेले दोघेजण तिच्या मदतीला येऊ लागले. हे पाहताच अकबर याने ही घटना कोणाला सांगितली तर तुला व तुझ्या कुटूंबीयांना जीवे मारुन टाकीन अशी धमकी दिली.
यानंतर या मुलींनी घरी जाऊन कुटूंबीयांना माहिती दिली. कुटूंबीयांनी या मुलींना घेवून पेठबीड पोलिस ठाण्यात धाव घेतली असून अकबर कुरेशी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पेठबीड पोलिस करत आहेत.