माजलगाव : अल्पवयीन भोळसर मुलीवर झालेल्या अत्याचारात ती गर्भवती होती याची माहिती येथील जाजू हॉस्पिटलच्या संचालिका यांच्यासह तेथील परिचारिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अद्यापही पोलिसांनी अटक केलेली नाही.
माजलगाव तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय मुलीचे पोट दुखत असल्याने तिला माजलगाव येथील एका खासगी रुग्णालयात कुटुंबियांनी तपासणीसाठी नेले होते. सोनोग्राफी तपासणीत मुलगी दोन महिन्यांची गर्भपती असल्याचे बाब समोर आली. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी तिला माजलगाव शहरातील जाजू हॉस्पिटल या ठिकाणी घेऊन गेले होते.
सदरील मुलगी अल्पवयीन व गर्भवती असल्याची माहिती या हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. उर्मिला जाजू यांना माहीत असताना त्यांनी आरोग्य विभाग व पोलिसांना ही बाब कळवणे आवश्यक होते परंतु त्यांनी ही बाब लपवली. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर या रुग्णालयातील एका परिचारिकेने डॉ. नर्गिस जावेद शेख यांचा नंबर दिला होता त्यामुळे या परिचारिकेवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील गर्भपात करणाऱ्या डॉ. नर्गिस जावेद शेख या जिल्हा रुग्णालयात रक्तदाब वाढल्यामुळे ऍडमिट करण्यात आले होते त्या ठिकाणी त्यांच्यावर पोलिसांचा पहारा आहे. चार दिवसानंतर देखील त्यांना अटक दाखवण्यात आली नसल्याचे देखील पोलिसांकडून सांगण्यात आले. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणी तिचे वडील , एक डॉक्टर व एक परिचारिका यांच्यावर आतापर्यंत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात आणखीन कोणा कोणाचा सहभाग आहे हे पोलीस तपासानंतर स्पष्ट होऊ शकते. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली होती.