death hanging  file photo
बीड

अन्वर अडकला पूजाच्या प्रेमात अन् लग्नाचा तगादा लावताच अडकवला गळफास गळ्यात

विवाहबाह्य अनैतिक संबंधातून दोन मुलांचा बाप असलेल्या विवाहित इसमाने जीवन संपवले, महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

गौतम बचुटे

केज : तालुक्यातील एका विवाहित असलेल्या आणि दोन मुलांचा बाप असलेल्या इसमाचे एका महिलेसोबत विवाहबाह्य अनैतिक प्रेमसंबंध होते. त्यामुळे त्या महिलेने तुझ्या पहिल्या पत्नीला तलाक देऊन माझ्याशी लग्न कर अन्यथा तुझ्याविरुद्ध ॲट्रॉसिटीसह गंभीर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. त्याने ना बायकोला सोडले ना जिच्यावर प्रेम होते त्या मैत्रिणीशी लग्न केले. या त्रासाला वैतागून त्याने स्वतःच गळफास घेऊन जीवन संपल्याची दुर्दैवी घटना केज तालुक्यात घडली आहे.

केज तालुक्यातील जाधव जवळा येथील अन्वर दिलावर शेख वय (३८ वर्ष) या विवाहित आणि दोन मुलांचा बाप असलेल्या इसमाचे गावातील एका पूजा नावाच्या तरुणीसोबत अनेक दिवसांपासून विवाहबाह्य अनैतिक सबंध होते. याची कुणकुण अन्वर याच्या पत्नीला दोन वर्षापूर्वी माहीत झाले होते. त्यामुळे अन्वरची पत्नी ही तिच्या दोन मुलांना घेऊन पतीसह केजला राहायला आले होते. मात्र तरी देखील पूजा अन्वरचा नाद सोडायला तयार नव्हती. ती अन्वरला त्याच्या मोबाईलवर व्हॉट्सअप मेसेज पाठवून "तू तुझ्या बायकोला सोडून दे आणि माझ्याशी लग्न कर; नसता तुझ्यावर ॲट्रॉसिटी गंभीर गुन्हा दाखल करीन." अशी धमकी देत होती.

दरम्यान शाळेला सुट्ट्या लागल्याने दि. १६ मे रोजी अन्वर हा त्याची पत्नी आणि मुलांना अहिल्यानगर येथे सोडून परत केजला आला होता. मात्र दि. १८ मे रोजी सकाळी ९:०० वा. च्या सुमारास त्याच्या पत्नीने त्याला फोन केला असता त्यांचा फोन लागत नसल्याने तिने तिच्या सासरे दिलावर शेख यांना फोन करून अन्वरचा शोध घेण्या संदर्भात माहिती दिली. त्यानुसार दिलावर शेख हे अन्वर याच्या भाड्याच्या खोलीवर गेले असताना त्यांना दरवाजा आतून बंद असल्याचे जाणवताच त्यांनी खिडकीतून आत पाहिले असता त्यांचा मुलगा अन्वर शेख याने खोलीच्या छताला असलेल्या फॅनच्या हुकला शालीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

त्यानंतर अन्वरच्या पत्नीच्या तक्रारीवरून अन्वरचे विवाहबाह्य अनैतिक सबंध असलेली पूजा नावाची मैत्रीण हिच्याशी लग्न करण्याच्या आणि खोट्या पोलिस केसच्या त्रासाला वैतागून त्याने जीवन संपवल्याप्रकरणी पूजा हिच्या विरुद्ध गु. र. नं. २९७/२०२६ भा. न्या. सं. १०८, ३५२(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम हे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT