बीड: कुख्यात गुन्हेगार वाल्मीक कराडचा राईट हॅन्ड म्हणून ओळखला जाणारा आणि सध्या फरार असलेला गोट्या गीते याचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तो दारूच्या नशेत एका घरासमोर 'राम नाम सत्य है...' म्हणत धिंगाणा घालत असल्याचे दिसत असून, या प्रकारामुळे बीडच्या गुन्हेगारी वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये गोट्या गीते हा पूर्णपणे दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. हातात कागदावर ठेवलेला ग्लास घेऊन तो एका घरासमोर उभा राहतो आणि 'राम नाम सत्य है...' असे म्हणत हात जोडतो. हे कृत्य म्हणजे समोरच्या व्यक्तीला एकप्रकारे धमकी देण्याचाच प्रकार असल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे, हा व्हिडिओ शूट करणारे लोक त्याच्या या कृत्यावर हसत असल्याचेही पार्श्वभूमीवर ऐकू येत आहे.
गोट्या गीते हा वाल्मीक कराड टोळीचा सक्रिय सदस्य असून त्याच्यावर परळीसह जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मोक्का कायद्यांतर्गत (MCOCA) कारवाई देखील करण्यात आलेली आहे. इतकेच नाही, तर महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातही तो प्रमुख संशयित असून, पोलीस त्याच्या मागावर आहेत. एका गंभीर गुन्ह्यात पोलीस शोध घेत असतानाही तो अशाप्रकारे उघडपणे फिरत धिंगाणा घालत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, त्याचा शोध तीव्र करण्यात आला आहे.