बीड : मनोज जरांगे पाटील हे सराटी अंतरवाली येथे मराठा आरक्षण प्रश्नावर आंदोलन करत आहेत. त्यांच्या समर्थनार्थ बीड व आष्टी मध्ये रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या पन्नास ते साठ आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मनोज जरांगे पाटील हे दिनांक 29 ऑगस्ट पासून सराटी अंतरवाली येथे उपोषण करत आहेत. त्यांच्या समर्थनार्थ 3 सप्टेंबर रोजी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. या दरम्यान आष्टी येथे बीड ते अहिल्यानगर मार्गावर सुनील रेडेकर यांच्यासह दहा ते बारा जणांनी बेकायदेशीर रित्या रस्त्यावर टायर जाळत रस्ता रोको आंदोलन केले होते. या प्रकरणात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे सोलापूर - धुळे महामार्गावर बार्शी तालुक्यातील प्रदीप पाटील यांच्यासह 25 ते 30 लोक रस्त्यावर बसून जोरदार घोषणाबाजी करत होते. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. तसेच रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सोलापूर - धुळे महामार्गावरच पारगाव जप्ती फाटा येथे देखील अज्ञात लोकांनी टायर जाळून रस्ता अडवला होता. यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन वाहतूक सुरळीत केली होती. या दोन्ही प्रकारात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.