केज : संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान उचलण्यासाठी बँकेत आलेल्या एका ६० वर्षाच्या महिलेचे केज येथील बस स्टँडवरून एका बसमध्ये बसवून अज्ञात महिलांनी अपहरण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील लव्हुरी येथील अनुसया युवराज शिनगारे या दि. २६ एप्रिल रोजी सकाळी केज येथील महाराष्ट्र बँकेत त्यांचे संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान उचलण्यासाठी आल्या होत्या. दुपारी ४ वाजले तरी अनुसया शिनगारे या घरी न आल्यामुळे त्यांचा मुलगा बापू शिनगारे यांनी त्यांना फोन केला.
यावेळी त्यांनी सांगितले की, त्या बँकेतील कामकाज आटोपून आपल्या गावी जाण्यासाठी केज येथील बस स्टँडवर आल्या असता काही अनोळखी महिलांनी त्यांचे एस. टी. बस मधून अपहरण करून धाराशिवच्या दिशेने घेवून गेल्या आहेत. त्यांचे अपहरण करून त्यांना ज्या ठिकाणी ठेवले आहे ते निर्जन ठिकाण असल्याचे त्यांनी सांगितले.
या माहितीवरून त्यांचा मुलगा बापू शिनगारे यांनी केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्या नुसार अज्ञात अपहरणकर्त्या विरुध्द केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपहरण प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल महावीर सोनवणे हे करीत आहेत.