बीड : जुन्या वादातून भरदिवसा तरुणाचे अपहरण करून त्याला बेल्ट आणि काठीने बेदम मारहाण करत त्याची हत्या करणाऱ्या दोघांना बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हा खटला बीडमध्ये गाजला होता. सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील अॅड. अजय राख यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने हा निकाल दिला.
सिद्धांत किरण गायकवाड (२०, रा. माळी-वेस, बीड) असे मयत तरुणाचे नाव आहे. तर अक्षय उर्फ चिंटू मिठू गायकवाड आणि अभिषेक सचिन गायकवाड (दोघे रा. पात्रुड गल्ली, बीड) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
दि. २ जुलै २०२२ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आरोपी अक्षय आणि अभिषेक यांनी जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी सिद्धांत याचे दुचाकीवरून अपहरण केले. त्याला बीड शहर-राजवळील खंडेश्वरी मंदिर परिसरातील जिजामाता विद्यालयाच्या एका पडक्या खोलीत नेऊन डांबले. तिथे त्याला बेल्ट आणि काठीने अमानुष मारहाण केली. यात सिद्धांत गंभीर जखमी झाला.
पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू
या घटनेनंतर किरण गायकवाड यांच्या तक्रारीवरून सुरुवातीला पेठ बीड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गंभीर जखमी सिद्धांतवर बीडमध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी पुण्याला हलवण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवण्यात आले. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अंधारे यांनी तपास करून दोन्ही आरोपींना अटक केली आणि न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
असा झाला खटला या प्रकरणाची सुनावणी
सुरुवातीला न्या. केदार जोगळेकर आणि त्यांच्या बदलीनंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद यावलकर यांच्यासमोर झाली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. अजय राख यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना सहाय्यक सरकारी वकील बी. एस. राख, अॅड. अनिल तिडके यांनी सहकार्य केले. तर फिर्यादीच्या वतीने अॅड. एस. एस. सावंत यांनी काम पाहिले. साक्षीपुरावे आणि वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.