Beed connection of drug trafficking syndicate
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
एमआरची नोकरी सोडून सुरू केलेला मेडिकलचा व्यवसाय बंद पडल्याने चाळीसगावचे अविनाश व रूपेश पाटील भावंडांनी नाशिकच्या अमोल येवलेसोबत औषधी मागवून थेट पेडलर्सना विक्री करण्याचा धंदा सुरू केला. मात्र शुक्रवारी वाळूजच्या ट्रान्सपोर्टमध्ये अडीच हजार सिरपचे पार्सल पकडून पोलिसांनी सिंडिकेटचा पर्दाफाश केला.
शहरातील पेडलर्ससह १२ जणांना अटक केली. ४१ जणांची नावे निष्पन्न करून गुन्हा दाखल झाला. दरम्यान, गुन्हे शाखेने बीड येथून १३ वा पेडलर जावेद खान रौफ खान (४२, रा. किलावेस, बीड) याला अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी रविवारी (दि.१४) दिली. त्याला गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अधिक माहितीनुसार, चाळीसगावचे अविनाश आणि रूपेश पाटील, नाशिकचा अमोल येवले हे शहरात सिरपचा माल पुरवठा करत असल्याची माहिती पोलिस आयुक्तांना मिळाली होती. त्यांनी नार्कोटिस आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याला पाळत ठेवण्याचे आदेश दिले. दोन महिने सर्व शहरातील पेडलर्सवरही लक्ष ठेवण्यात आले. दरम्यान, वाळूजच्या व्हीएलआर लॉजिस्टिकमध्ये औषधीचे पार्सल येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्तांना मिळाली.
त्यांनी गुन्हे शाखेचे डीसीपी रत्नाकर नवले, पोलिस निरीक्षक संभाजी पवार, गीता बागवडे यांना कारवाईचे आदेश दिले. सपोनि रविकांत गच्चे, अमोल म्हस्के, शिवाजी चौरे, अर्जुन कदम, संदीप काळे, चिखलीकर यांच्या पथकांनी छापा मारला. स्वतः पोलिस आयुक्त तिथे गेले. २ हजार ५०४ कोरेक्स सिरपच्या बाटल्यासह १२ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. रात्रीतून तिघांसह शहरातील मिळून १२ पेडलर्सच्या मुसक्या आवळून ४१ जणांवर गुन्हा दाखल केला. बीडहून १३ व्या आरोपीला अटक झाली. २८ आरोपींचा शोध घेतला जात आहे. अधिक तपास एपीआय विनायक शेळके करत आहेत.
मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खान्देशात नेटवर्क बंद पडलेल्या मेडिकल परवाना आणि जीएसटी नंबरचा वापर करून त्यावरच कंपनी, औषधी डिस्ट्रिब्युटर्सकडून मुख्य आरोपी रूपेश व अविनाश पाटील, अमोल येवले हे माल मागवीत होते. मेडिकलचा परवाना असलेल्या येवलेला २० टक्के कमिशन दिले जात होते. शहरातील पेडलर्सची लिंक लागल्याने चार महिन्यात माल मागवून विक्रीचा सपाटा लावला होता. लाखोंची उलाढाल सुरू होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांची बँक खात्यांची तपासणी सुरू केली आहे. मेडिकल कधीपासून बंद होते? केव्हापासून माल मागविला जात होता? याचा तपास सुरू आहे. जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथून सिंडिकेट ऑपरेट होत होती.
एनडीपीएस पथकाने २८ ऑगस्टला नांदेडचा पुरवठादार इरफान घोरवडेचे नेटवर्क उघड केले होते. तो १७ वर्ष एमआर होता. नंतर स्वतःचा वितरक एजन्सी परवाना काढून थेट गुजरातच्या कंपनीतून औषधी, गोळ्या मागवून रॅकेट चालवीत होता. त्यामुळे पेडलर्सच्या संपर्कात येणारे मेडिकल चालक, एमआर, पुरवठादार यांचा सहभाग सातत्याने कारवायांमध्ये समोर येत असल्याचे दिसून येत आहे.
पाटील, येवले हे सिंडिकेटमध्ये आल्याने संभाजीनगरच्या पेडलर्सची चांदी झाली. वाळूज भागात ट्रान्सपोर्टने माल आल्यानंतर तेथून ते मराठवाड्यात वितरित करू लागले. बीडचा पेडलर जावेद तिथे विक्री करून तरुणांना नशेच्या खाईत लोटत होता.