गेवराई : गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील सीआयएसएफ जवानाने मुंबईतील ओएनजीसी मुख्यालयातील राहत्या खोलीत गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली. अशोक विष्णू गर्जे (वय ३६) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे.
घटना आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. अशोक गर्जे हे मुंबईतील माहीम पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सीआयएसएफ ओएनजीसी मुख्यालयाच्या इमारतीतील खोली क्रमांक २२ मध्ये राहत होते. याच खोलीत त्यांनी दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच माहीम पोलीसांनी पंचनामा करून तलवाडा पोलीस ठाण्यास यासंदर्भात कळवले.
अशोक गर्जे हे तलवाडा (रामनगर) येथील रहिवासी विष्णू जिजाबा गर्जे यांचे सुपुत्र होते. ही बातमी समजताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या पार्श्वभूमीवर वडील विष्णू गर्जे यांनी तलवाडा पोलीस ठाण्याच्या माध्यमातून माहीम पोलिसांना नाहरकत प्रमाणपत्र सादर करत मृतदेह त्यांच्या भाचा दत्तात्रय नाकाडे यांच्या ताब्यात देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. दत्तात्रय नाकाडे हे चेंबूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अशोक गर्जे यांचा मृतदेह तलवाडा येथे आणण्यात येणार असून उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याचे समजते. दरम्यान, आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून माहीम पोलीस अधिक तपास करत आहेत.