कडा :- आष्टी तालुक्यात धक्कादायक घटना घडली असून एका युवकाला छातीत गोळी लागून त्याचा मृत्यू झाला. त्याच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला की त्याने स्वतःवर गोळी झाडून घेतली. याबाबत संदिग्धता आहे. घटनेनंतर परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. आष्टी तालुक्यातील अंभोरा-हिवरा रस्त्यावर एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या तरुणाच्या छातीत गोळी झाडल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसत आहे, तर मृतदेहाजवळच एक दुचाकी आणि विनापरवाना पिस्तूल आढळून आले आहे. ही खळबळजनक घटना शनिवारी अंभोरा पोलीस ठाणे हद्दीत समोर आली.
आष्टी तालुक्यातील वाघळुज येथील मयूर उर्फ बाळा रामदास चव्हाण (वय ३५) याचा मृतदेह अंभोरा-हिवरा रस्त्यावरील कच्या रस्त्यालगत सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास येणाऱ्या- जाणाऱ्या लोकांना दिसला. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. रस्त्याच्या कडेला लावलेली एक दुचाकी, छातीत गोळी लागल्याची जखम आणि मृतदेहाजवळ पडलेले पिस्तूल पोलिसांना आढळून आले. मयूर चव्हाण हा मिस्त्री काम करत होता. त्याच्याजवळ विनापरवाना पिस्तूल आले कुठून,कोणी अज्ञात कारणांसाठी गोड बोलून निर्मनुष्य जागेवर त्याची हत्या केली की त्याने आत्महत्या केली,याबाबतचे गुढ अद्याप कायम आहे.
घात की आत्महत्या पोलिसांकडून कसून तपास...
या घटनेमागे घातपात असण्याची शक्यता वर्तवली जात असून, परिसरात याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. घटनास्थळी आष्टीचे उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे, अंभोरा ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे,पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत तावरे, आदिनाथ भडके यांच्यासह पोलीस हवालदार बाबासाहेब गर्जे,पोलीस अंमलदार शिवदास केदार, अमोल ढवळे आणि अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.