Beed Boiler fire start of Yedeshwari factory
बीड, पुढारी वृत्तसेवा: पूर्वी ऊसउत्पादकांना आपला ऊस घेऊन जाण्यासाठी कारखानदारांकडे चकरा माराव्या लागत. हे बंद करण्यासाठी शेतकरी केंद्रबिंदू माणून आपण येडेश्वरी साखर कारखान्याच्या उभारणीचा निर्णय घेतला. यानंतर हा कारखाना हळूहळू मोठा केला. आज या कारखान्यामुळे शेतकऱ्यांना आपला ऊस घेऊन जाण्यासाठी कुठेही जावे लागत नाही, आणि ऊसदरही अपेक्षित मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो, हाच आनंद पाहून आपल्याला समाधानी वाटते, असे प्रतिपादन खा. बजरंग सोनवणे यांनी केले.
येडेश्वरी साखर कारखाना लि. आनंदगाव सा. युनिट नं. १ चा १२ वा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा मोठ्या उत्साहात झाला. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना खा. बजरंग सोनवणे म्हणाले, मागच्या काही वर्षापुर्वी शेतकऱ्यांना कारखान्याची गरज होती. आता कारखान्याला शेतकऱ्यांची गरज आहे. साखर कारखाना हा तीन चाकी रिक्षा आहे.
यातील एक चाक म्हणजे ऊसउत्पादक, दुसरे चाक ऊसतोड मजूर आहे तर तिसरे चाक हे कारखान्यातील कर्मचारी आहेत, यातील एक चाक जरी रस्त्यावरून घसरले तर जिल्ह्यात अनेक कारखान्याचे काय झाले?, हे आपण पाहत आहोत. कारखानदारी आता सोपी राहिलेली नाही. कारखाना चालविताना समन्वय असणे आवश्यक आहे. आपण शेतकरी केंद्रबिंदू मानून कारखान्याची उभारणी केली. त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलावे, त्यांचे प्रपंच उभा रहावे, असा उद्देश कारखाना उभारणी करताना ठेवलेला आहे.
उसउत्पादक, ऊसतोड मजूर यांना जपण्याचे काम केले आहेच पण कारखान्यातील कर्मचाऱ्यांना देखील कधीही नाराज केलेले नाही. या वर्षी त्यांच्यासाठी चांगली वेतन वाढ करण्यात आलेली आहे. यामुळे कर्मचारी खूष आहेत. हा कारखाना दरवर्षपिक्षा यावेळी अधिक उस गाळप करण्याचा प्रयत्न करेल. शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस घेवून जाण्यासाठी प्रयत्न करेल. आपला कारखाना अडीच हजार टनवरून आठ हजार कॅपीसीटीपर्यंत गेला आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उप प्रदेशाध्यक्षा संगीता ठोंबरे, माजी आ. पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पदवीधर संघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, येडेश्वरी साखर कारखान्याचे संचालक बाळकृष्ण भवर, सारिका बजरंग सोनवणे, सौरव सोनवणे यांच्यासह पंचक्रोशीतील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.