Beed teacher recruitment scam pudhari photo
बीड

Beed teacher recruitment scam : बीड जिल्हा परिषदेतील बोगस शिक्षक भरती प्रकरण!

अभिलेखात प्रचंड खाडाखोड; आवक जावक प्रकरणी नूतन समिती घेणार आढावा

पुढारी वृत्तसेवा

बीड : बीड जिल्हा परिषदेतील बहुचर्चित बोगस शिक्षक भरती प्रकरणात दररोज नवनवे धक्कादायक खुलासे होत असून चौकशी समितीच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने तयार करण्यात आलेल्या बनावट आदेशांवर अत्यंत चुकीच्या पद्धतीने आवक-जावक क्रमांक टाकण्यात आल्याचे उघड झाले आहे. तसेच आवक-जावक नोंदवहीमध्ये मोठ्या प्रमाणावर खाडाखोड आणि हेरफेर केल्याचे स्पष्ट निदर्शनास आले आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत शिक्षण उपसंचालकांनी तीन सदस्यीय स्वतंत्र चौकशी समिती गठीत केली आहे. ही समिती लवकरच बीडमध्ये दाखल होऊन संपूर्ण अभिलेख ताब्यात घेणार आहे.

‘दैनिक पुढारी’ने या बोगस शिक्षक भरती प्रकरणाचा घोटाळा सातत्याने चव्हाट्यावर आणून शिक्षण विभागाचा बुरखा टवकारला होता. ‘पुढारी’च्या वृत्ताचा पाठपुरावा आणि वाढत्या दबावानंतर प्रशासनाला अखेर चौकशीचे आदेश द्यावे लागले आहेत. एकीकडे चौकशीचा फार्स सुरू असताना दुसरीकडे मुख्य सूत्रधार आणि दोषींवर अद्याप कोणतीही कडक कारवाई करण्यात आलेली नाही.

त्यामुळे या प्रकरणात पुरावे नष्ट केले जाण्याची किंवा संशयितांना पाठीशी घालण्याची भीती व्यक्त होत आहे. तक्रारदार समाजसेवक इंजि. सादेक इनामदार यांनी शिक्षण आयुक्तांकडे स्पष्ट मागणी केली आहे की, चौकशीच्या नावाखाली वेळकाढूपणा न करता आधी या घोटाळ्यातील मुख्य दोषींवर कठोर गुन्हे दाखल करा आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी पूर्ण करा.

दरम्यान, शिक्षण संचालकांच्या या धडक भूमिकेमुळे आणि नव्याने येणाऱ्या चौकशी समितीच्या धकाधकीमुळे बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात प्रचंड खळबळ उडाली असून कमालीची शांतता पसरली आहे. आपले पाप लपवण्यासाठी आणि बोगस नोंदींवर पांघरूण घालण्यासाठी सध्या शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची अभिलेख जुळवाजुळवीची केविलवाणी धडपड सुरू आहे.

शिक्षणाधिकारी पालकर घेणार झाडाझडती !

बीड जिल्ह्यातील या महाघोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेता शिक्षण संचालक माधव पालकर यांनी विशेष पाऊल उचलले आहे. सन २०१९ ते २०२५ या कालावधीत बीड जिल्ह्यात संचमान्यता मिळालेल्या सर्व शिक्षकांची सखोल माहिती आणि कुंडली गोळा करण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. याबाबतचे संपूर्ण अभिलेख तात्काळ सादर करण्याचे कडक निर्देश त्यांनी शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. पालकर यांच्या या थेट हस्तक्षेपामुळे बोगस भरतीच्या माध्यमातून सेवेत रुजू झालेल्या बोगस शिक्षकांचे आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT