केज : केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे पाटलांच्या माळावर एका वळणावर मोटार सायकल झाडाला धडकून एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.२५) दुपारी ४.३० च्या सुमारास घडली. संपत शिवाजी राऊत (वय ३०) असे या मृत तरूणाचे नाव आहे. दोन वर्षापूर्वी या तरुणाने गावातील एका मुलीशी पळून जाऊन आंतरजातीय विवाह केला होता. घटनेपूर्वी तरुणाचे त्याच्या पत्नीच्या नातेवाईकांशी भांडण झाल्याचे सांगत नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, चिंचोली माळी येथील संपत राऊत हा मोटार सायकलवरून केजकडे जात होता. तो चिंचोली माळी येथे आला असता त्याचे मोटरसायकलवरील नियंत्रण सुटले व भरधाव मोटरसायकल रस्त्याच्या एका वळणावर असलेल्या झाडाला जाऊन धडकली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान मृत तरूणाचा भाऊ विशाल राऊत आणि वडील शिवाजी राऊत यांनी संपतचा मृत्यू अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. अपघातापूर्वी त्याचे व त्यांच्या पत्नीच्या कुटुंबियांबरोबर त्याचे भांडण झाले होते. यातून हा घातपात झाल्याचा त्यांनी संशय व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या आदेशाने पोलिस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब बांगर आणि पोलीस नाईक गोविंद मुंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.