Beed Accident News
नेकनूर : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील चौसाळा परिसरात झालेल्या भीषण अपघातात नेकनूर येथील शिक्षक मुदस्सर अली हाश्मी (वय ४५ वर्ष.रा. नेकनूर) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.5) रात्री ११ वाजता घडली.
हाश्मी हे दुचाकीवरून सोलापूरहून नेकनूरकडे येत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, सदर अपघात ज्या वाहनाकडून घडला ते वाहन एका बीड जिल्ह्यातील ट्राफिक पोलिसाचे खाजगी वाहन असल्याची माहिती समोर आली आहे.
अपघातानंतर संबंधित पोलीस अधिकारी मदत न करता घटनास्थळावरून निघून जात असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहनचालकाला स्थानिक नागरिकांनी अडवून चोप दिला आणि तत्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
आवश्यक पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नेकनूर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला. या अपघातामुळे नेकनूर परिसरात शोककळा पसरली आहे. शिक्षक मुदस्सर अली हाश्मी यांच्या आकस्मिक निधनामुळे शिक्षण क्षेत्रात आणि सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. मंगळवारी नमाजे जोहरनंतर त्यांच्यावर नेकनूर येथील दर्गा मस्जिद परिसरात शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आली.