पाच दिवसांच्या बँकिंगसाठी जोरदार आंदोलन pudhari photo
बीड

Beed bank employees protest : पाच दिवसांच्या बँकिंगसाठी जोरदार आंदोलन

बीड, अंबाजोगाई, परळी, केजसह विविध ठिकाणी निदर्शने; धोरणांविरोधात घोषणाबाजी

पुढारी वृत्तसेवा

बीड : आठवड्यातील पाच दिवस बँकिंग व्यवस्था लागू करावी, सर्व शनिवारची सुट्टी जाहीर करावी, तसेच बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांची तातडीने पूर्तता करावी, या प्रमुख मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बैंक युनियन्सच्या राष्ट्रीय आवाहनानुसार गुरुवारी बीड जिल्ह्यात बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जोरदार आंदोलन केले. बीड शहरासह अंबाजोगाई, परळी, केज आणि जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये बँक कर्मचारी एकवटले असून, सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली.

या आंदोलनामुळे विविध बँकांच्या परिसरात काही काळ वातावरण आंदोलनमय झाले होते. स्टेट बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशन आणि स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाला बँक ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ग्रामीण बँक, पंजाब नॅशनल बँक यांसह इतर बँकांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध बँकांतील कर्मचारी एकाच व्यासपीठावर येत आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवत असल्याने बँक कर्मचाऱ्यांची एकजूट या आंदोलनातून ठळकपणे दिसून आली.

बीड येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान एसबीआय ऑफिसर्स असोसिएशनचे रिजनल प्रेसिडेंट कॉम्रेड जयेश भोसले, एसबीआय स्टाफ युनियनचे रिजनल सेक्रेटरी कॉम्रेड अनंता वालेकर, कॉम्रेड विनोद मुळेकर आणि कॉम्रेड विपिन गिरी यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

कॉम्रेड अनंता वालेकर यांनी यावेळी आक्रमक भूमिका मांडत बँक अधिकारी व कर्मचारी आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नसल्याचा इशारा दिला. सरकारने पाच दिवसांचा कार्यसप्ताह तातडीने लागू करावा, अशी मागणी त्यांनी केली. तर कॉम्रेड विनोद मुळेकर आणि कॉम्रेड विपिन गिरी यांनी बँक कर्मचाऱ्यांच्या इतर प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधत संघटनांच्या पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली.

दरम्यान, आंदोलनाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 'पाच दिवसांचे बँकिंग तात्काळ लागू करा', 'बँक कर्मचारी-अधिकारी एकजुटीचा विजय असो', 'यूएफबीयू झिंदाबाद', 'नया पीएलआय नियम मागे घ्या' अशा घोषणांनी बँक परिसर दुमदुमून गेला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT