Beed Banjara community unite Sanjay Rathod
गेवराई, पुढारी वृत्तसेवा: गेवराई येथे महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य बंजारा जागृती मेळाव्यात राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी बंजारा समाजाने संविधानिक हक्कांसाठी संघटित होऊन लढा उभारावा, असे आवाहन केले. समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आपण संपूर्ण ताकदीने सोबत असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
गजानन लॉन्स, कोल्हेर रोड येथे झालेल्या या मेळाव्यात बोलताना राठोड म्हणाले, राज्यातील बंजारा तांड्यांचा सर्वांगीण विकास, समाजाला संविधानिक हक्क मिळवून देणे तसेच सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि राजकीय क्षेत्रात समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. समाजाचा विकास हाच आपला ध्यास असून न्याय व हक्कांसाठी शासनदरबारी कायम पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय बंजारा महासंघाचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष प्रा. पी. टी. चव्हाण होते. व्यासपीठावर पोहरादेवीचे महंत जितेंद्र महाराज, प्रा. फुलसिंग जाधव, बाळराजे पवार, यशराज पंडित, संजय चव्हाण, उत्तम चव्हाण, अण्णासाहेब राठोड, चंद्रकांत नवले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विद्यार्थी, डॉक्टर व समाजसेवकांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रांतील योगदानाची दखल घेत संजय राठोड यांना राज्यस्तरीय 'बंजारा भूषण' पुरस्काराने गौरविण्यात आले. मेळाव्यास विविध जिल्ह्यांतील महिला, युवक, अधिकारी, कर्मचारी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव चाटे यांनी केले. आयोजनासाठी आदर्श विष्णूभैय्या राठोड, लक्ष्मण चव्हाण, हरिभाऊ महाराज, राहुल चव्हाण, विजय राठोड, कैलास राठोड यांच्यासह कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.