Beed News : आष्टी परिसरात वाघाचा वावर; ३ ऑगस्टला आढळल्या पाऊलखुणा file photo
बीड

Tiger Attack Beed | आष्टी तालुक्यातील 'त्या' शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला; पाऊलखुणांच्या तपासणीवरून वनविभागाचा खुलासा

देवळाली शिवारातील सोनीपठार परिसरात थरार; चारा आणण्यासाठी गेलेल्या देविदास टकले यांना वाघाने ५०० फूट फरफटत नेले

पुढारी वृत्तसेवा

Farmer Attacked Ashti

राजू म्हस्के

कडा : आष्टी तालुक्यातील देवळाली (लोखंडी) शिवारातील सोनीपठार परिसरात शनिवारी (दि. ७) सकाळी वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. देविदास माणिक टकले (वय ४०, रा. देवळाली परिसर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, परिसरात हल्ला करणारा वन्यप्राणी बिबट्या की वाघ, याबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून, वनविभागाने हा हल्ला पट्टेदार वाघानेच केल्याचे स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे देवळालीसह परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

आष्टी वनपरिक्षेत्रातील देवळाली-पानाची शिवारात गेल्या काही दिवसांपासून हिंस्र वन्यप्राण्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये चिंता होती. शनिवारी सकाळी सोनीपठार परिसरात घडलेल्या घटनेनंतर हा वन्यप्राणी नेमका कोणता, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आष्टीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांनी घटनास्थळाची पाहणी करून वन्यप्राण्याच्या पाऊलखुणांची तपासणी केली. त्यानंतर हल्ला करणारा वन्यप्राणी बिबट्या नसून पूर्ण वाढ झालेला पट्टेदार वाघ असल्याचे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, आष्टी तालुक्यातील देवळाली-लोखंडवाडी परिसरातील सोनीपठार भागात दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गुरांसाठी गवत आणण्यासाठी देविदास टकले हे शनिवारी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास डोंगराळ भागात गेले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक झडप घातली. या भीषण हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर वाघाने त्यांचा मृतदेह सुमारे ५०० फूट अंतरापर्यंत फरफटत नेल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. वनविभागाने पाऊलखुणांच्या तपासणीनंतर वाघाच्या हल्ल्याची पुष्टी केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी धामणगाव येथील आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे. वनविभागाकडून पुढील तपास आणि आवश्यक कार्यवाही सुरू आहे.

या घटनेनंतर देवळाली, लोखंडवाडी आणि परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी व ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली असून, शेतात जाणेही धोकादायक बनले आहे. वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, परिसरात वनविभागाची गस्त वाढवावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

दुष्काळामुळे जनावरांच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना डोंगराळ भागात भटकंती करावी लागत असतानाच आता वाघाच्या हल्ल्याने ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

चारा टंचाईवर उपाययोजना करा; चारा डेपो आणि छावण्या सुरू करण्याची मागणी

एकीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, तर दुसरीकडे चारा आणण्यासाठी शेतात किंवा डोंगराळ भागात जाणेही शेतकऱ्यांच्या जीवावर बेतत आहे. देवळाली शिवारातील वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर शासन आणि प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आष्टी तालुक्यात तातडीने चारा डेपो किंवा चारा छावण्या सुरू कराव्यात. गावपातळीवरच जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी शेतकरी आणि ग्रामस्थांकडून होत आहे.

जयदत्त धस यांच्यासह स्थानिक नेत्यांची घटनास्थळी भेट, परिस्थितीचा घेतला आढावा; वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी

घटनेची माहिती मिळताच आष्टीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे, वनपाल दत्तात्रय जायभाय, लक्ष्मण तागड, अशोक काळे यांच्यासह वनविभागाच्या शीघ्र कृती दलाने घटनास्थळी धाव घेतली. युवा नेते जयदत्त धस, संजय गाढवे, शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी, सरपंच मोहन आमटे, रमेश तांदळे, बंडू तळेकर यांच्यासह स्थानिक नेत्यांनीही घटनास्थळी भेट दिली.

यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून घटनेची माहिती घेतली. संतप्त ग्रामस्थांची समजूत काढतानाच वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी गस्त वाढवावी आणि आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी वनविभागाकडे केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT