Ashti Rural Hospital facilities chaos 
बीड

Beed Ashti Rural Hospital facilities|आष्टी ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा बोजवारा; हिरकणी कक्षाला कुलूप !

स्तनदा मातांची कुचंबणा; पुरुष स्वच्छतागृहही बंद, पिण्याच्या पाण्याचीही गैरसोय; डॉक्टरांचे दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा

कडा, पुढारी वृत्तसेवा: रुग्णांना आरोग्यसेवा देण्याची जबाबदारी असलेल्या आष्टी ग्रामीण रुग्णालयातच मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. स्तनदा माता आणि नवजात बालकांसाठी उभारण्यात आलेला हिरकणी कक्ष कुलूपबंद, पुरुष स्वच्छतागृहाला कुलूप, पिण्याच्या पाण्याच्या फिल्टरचा नळ हँडक्लोजने बंद, तर परिसरात ठिकठिकाणी अस्वच्छता आणि गुटखा, मावा खाऊन थुकल्याचे डाग दिसून येत आहेत.

त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना सुविधांऐवजी गैरसोयींचाच सामना करावा लागत आहे. शासन लाखो रुपये खर्चुन सुविधा उभारते; मात्र त्या प्रत्यक्ष वापरासाठी खुल्या नसतील तर त्याचा उपयोग काय, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

स्तनदा माता आणि त्यांच्या तान्ह्या बाळांसाठी स्वतंत्र व सुरक्षित जागा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सार्वजनिक रुग्णालयांमध्ये हिरकणी कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, आष्टी ग्रामीण रुग्णालयातील हा कक्ष ऐन ओपीडीच्या वेळेतही कुलूपबंद असल्याचे दिसून आले. आष्टी परिसरातील वाड्या-वस्त्यांवरून अनेक महिला उपचारासाठी तसेच बालकांच्या लसीकरणासाठी रुग्णालयात येतात. त्यांच्यासोबत लहान बाळेही असतात.

अशा वेळी स्तनपानासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध नसल्याने मातांना गर्दीत किंवा उघड्यावर बसून बाळांना दूध पाजण्याची वेळ येत आहे. महिलांच्या गोपनीयतेचा आणि सोयीचा विचार करून निर्माण केलेली सुविधा प्रत्यक्षात बंदच राहत असल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रुग्णालयात पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टरची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, फिल्टरच्या पाण्याचा नळ हँडक्लोजने बंद करून ठेवल्याचे दिसून आले.

त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना पिण्याच्या पाण्यासाठीही अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच रुग्णालयाच्या परिसरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य असून, मावा, सुपारी आणि गुटखा खाऊन थुंकल्याचे डाग दिसत आहेत. रुग्णालयात स्वच्छता आणि आरोग्यदायी वातावरण अपेक्षित असताना खुद्द आरोग्य विभागाच्या इमारतीतच अस्वच्छता दिसत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सुविधा केवळ कागदावरच ?

रुग्णालयातील गैरसोयींचा आणखी एक प्रकार म्हणजे पुरुषांसाठीचे स्वच्छतागृहही कुलूप लावून बंद ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना स्वच्छतागृहासारख्या मूलभूत सुविधेसाठीही अडचणी सहन कराव्या लागत आहेत. हिरकणी कक्षापासून स्वच्छतागृहापर्यंत सुविधा बंद अवस्थेत असतील, तर रुग्णालय प्रशासन नेमके कोणासाठी काम करीत आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. दरम्यान, या प्रकाराची वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन हिरकणी कक्ष नियमित खुला ठेवावा, स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुरळीत करावी, तसेच रुग्णालयातील स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शिवसंग्रामचे बाबू धनवडे यांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

वैद्यकीय अधीक्षक लग्नसमारंभात

दर सोमवारी आष्टी ग्रामीण रुग्णालयात डोळे तपासणी शिबीर आयोजित केले जाते. त्यामुळे या दिवशी डोळ्यांच्या तपासणीसाठी आलेले वृद्ध महिला-पुरुष तसेच इतर आजारांवरील उपचारासाठी आलेल्या रुग्णांची मोठी गर्दी होती. याचवेळी वैद्यकीय अधीक्षक नातेवाइकाच्या लग्नसमारंभासाठी व्यस्त असल्याचे समजले. त्यांच्या अनुपस्थितीत रुग्णालयाच्या कामकाजाची जबाबदारी वैद्यकीय अधिकारी डॉ. गुट्टे, डॉ. ढाकणे आणि डॉ. बेग यांच्यावर सोपविण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, वैद्यकीय अधीक्षकांच्या अनुपस्थितीत रुग्णालयातील मूलभूत सुविधा सुरळीत सुरू आहेत का, हिरकणी कक्ष आणि स्वच्छतागृह बंद का ठेवण्यात आले, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT