Ashti Police Raid Pudhari
बीड

Illegal Sand Mining Beed | आष्टी पोलिसांचा वाळू तस्करांवर छापा; दोन टिप्पर पकडले, २७.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

लिंबोडी फाट्यावर मध्यरात्री कारवाई; सात ब्रास वाळूसह दोन टिप्पर जप्त, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Ashti Police Raid

कडा : आष्टी तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीचा व्यवसाय सुरू असतानाच आष्टी पोलिसांनी वाळू तस्करांविरोधात धडक कारवाई केली आहे. कडा-धामणगाव मार्गावरील लिंबोडी फाट्याजवळ विनापरवाना वाळू वाहतूक करणारे दोन सहा टायर टिप्पर पोलिसांनी पकडले. या कारवाईत सात ब्रास वाळूसह दोन्ही वाहनांचा मिळून तब्बल २७ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी टिप्परचे चालक आणि मालक अशा सहा जणांविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१२ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास पोलिसांचे पथक परिसरात गस्तीवर असताना त्यांना लिंबोडी फाट्याजवळून विनापरवाना वाळू वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सापळा रचला. यावेळी संशयास्पदरीत्या जाणारे दोन टिप्पर अडवून त्यांची तपासणी केली असता, दोन्ही वाहनांमधून वाळूची वाहतूक होत असल्याचे आढळून आले. संबंधित चालकांकडे वाळू वाहतुकीचा कोणताही अधिकृत परवाना किंवा वैध कागदपत्रे नसल्याचे तपासात स्पष्ट झाले.

दोन टिप्परमध्ये सात ब्रास वाळू

पोलिसांनी केलेल्या तपासणीत एमएच १२ पीक्यू ९५११ क्रमांकाच्या पहिल्या टिप्परमध्ये चार ब्रास वाळू आढळली. वाहन आणि वाळूसह त्याची एकूण किंमत १५ लाख २० हजार रुपये आहे. तर एमएच १६ क्यू ९१९२ क्रमांकाच्या दुसऱ्या टिप्परमध्ये तीन ब्रास वाळू आढळली. या वाहनाची व वाळूची एकत्रित किंमत १२ लाख १५ हजार रुपये आहे. अशा प्रकारे दोन्ही टिप्परमधील सात ब्रास वाळूसह एकूण २७ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

या प्रकरणी दोन्ही टिप्परचे चालक आणि मालक अशा सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आष्टी पोलीस करीत आहेत.

भारत पांढरे यांच्या पथकाची धडक कारवाई

पोलीस अधीक्षक नवनीत काँवत आणि अपर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी भारत पांढरे, पोलीस हवालदार प्रवीण क्षीरसागर आणि पोलीस अंमलदार अक्षय लोंढे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अवैध वाळू वाहतुकीविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे वाळू तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र, केवळ वाहतुकीदरम्यान कारवाई न करता अवैध वाळू उपसा, साठवणूक आणि वाहतुकीच्या संपूर्ण साखळीवर सातत्याने कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT