कडा (बीड) : देवी विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आष्टी पोलिसांनी अवैध डीजे चालकांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यात डीजे वाजविण्यास बंदी असतानाही नियमांचे उल्लंघन करून डीजे वाजविले जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ११ ऑक्टोबर रोजी ब्रह्मगाव फाटा, वनवेवाडी आणि कानडी शिवार परिसरात डीजे वाजविला जात असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक अवारे तसेच पोलीस कर्मचारी शेख, पाखरे, नवले आणि लोंढे यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन डीजे बंद केला.
त्यानंतर संबंधित डीजे चालक व मालकांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी आष्टी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येत असल्याची माहिती आष्टी पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, देवी विसर्जन मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था राखून प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आष्टी पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.