Kanadi Budruk Incident Ashti Police Action
कडा : कायद्याची भीती न बाळगता आष्टी तालुक्यातील कानडी बुद्रुक येथे एकाच रात्री तीन अल्पवयीन मुलींचे बालविवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आष्टी पोलिसांनी चौकशी करून संबंधित पालक, नातेवाईक आणि विवाहविधी करणाऱ्या पुरोहितासह एकूण १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ११ वाजता कानडी बुद्रुक येथे तीन अल्पवयीन मुलींचे विवाह लावून दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर संबंधितांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ मधील कलम ९, १० आणि ११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा गुन्हा क्रमांक ३७७/२०२६ आहे.
या प्रकरणात गंगाराम बाबू गायकवाड, हाउसाबाई गंगाराम गायकवाड, भिमा बाबू फुलमाळी, संगीता भिमा फुलमाळी, भिमा शंकर फुलमाळी, गजराबाई भिमा फुलमाळी, दगडू बाजीराव फुलमाळी, अलका दगडू फुलमाळी, संजय भिमा गायकवाड, विमल संजय गायकवाड, कान्हू बु-हाजी गायकवाड आणि संगीता कान्हू गायकवाड यांच्यासह विवाहविधी करणारे पुरोहित छगन विठ्ठल कुलकर्णी यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
बालविवाहाचा प्रकार समोर आल्यानंतर मंगळवारी दिवसभर पोलीस चौकीत ग्रामसेवक, नातेवाईक आणि ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू होती. पंच उपलब्ध नसल्याने पंचनामा करण्यास विलंब झाल्याचे ग्रामसेवक एम. ए. माळेकर यांनी सांगितले होते. त्यामुळे गुन्हा दाखल होण्यास झालेल्या विलंबाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
मात्र, पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने या प्रकरणाला आता कायदेशीर वळण मिळाले आहे.
बालविवाहासारख्या गंभीर प्रकाराला प्रोत्साहन देणाऱ्या तसेच विवाह लावून देण्यास सहकार्य करणाऱ्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी बालहक्क कार्यकर्ते तत्वशिल कांबळे यांनी केली आहे. केवळ गुन्हा दाखल करून न थांबता अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी गावपातळीवर प्रभावी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची मागणीही त्यांनी केली.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आष्टी पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार भाऊसाहेब आहेर पुढील तपास करीत आहेत.