Ashti Soybean Seed Distribution Issue
कडा : राज्य शासनाच्या मोफत सोयाबीन बियाणे वितरण योजनेत आष्टी तालुक्यात मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र आहे. सालेवडगाव येथील तब्बल ३१ शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करूनही टोकन न मिळाल्याने शेतकरी वंचित राहिले असून कृषी विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
पेरणीचा हंगाम तोंडावर असतानाही लाभार्थी शेतकऱ्यांना टोकन मिळवण्यासाठी वारंवार कृषी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याचे समोर आले आहे. “ऑनलाइन अर्ज करूनही ना टोकन मिळाले, ना बियाणे,” अशी तक्रार शेतकऱ्यांनी करत संताप व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर कृषी कार्यालयात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
अधिकाऱ्यांसमोरच शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत “बियाणे मिळाल्याशिवाय परत जाणार नाही,” अशी भूमिका घेतली. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली होती.
सालेवडगाव परिसरातील शेतकऱ्यांनी टोकन न मिळाल्यास कृषी कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशाराही दिला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
दरम्यान, टोकन वाटप, लाभार्थी निवड आणि उपलब्ध बियाणे साठ्याबाबत पारदर्शकता नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. ऑनलाइन प्रणाली असूनही अनेक पात्र शेतकरी वंचित राहत असल्याने संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
“वारंवार कृषी कार्यालयाच्या फेऱ्या मारूनही टोकन मिळत नाही. मग आमचा दोष काय?” असा सवाल शेतकरी शिवाजी सुंबे यांनी केला आहे.
पावसाळा तोंडावर आला असून पेरणीची तयारी सुरू असताना बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाच्या मोफत बियाणे योजनेच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, शेतकऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिला असून तातडीने तोडगा न काढल्यास घेराव, ठिय्या आंदोलन आणि रास्ता रोकोसारख्या तीव्र आंदोलनांचा इशारा देण्यात आला आहे. आता प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.