Ashti Taluka Water Crisis
राजू म्हस्के
कडा: गतवर्षी जून महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने आष्टी तालुक्यातील लहान-मोठे तलाव, बंधारे आणि जलसाठे पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहत होते. त्यामुळे पुढील किमान दोन वर्षे पाणीटंचाईची झळ बसणार नाही,अशी अपेक्षा तालुकावासीयांना होती. मात्र, अवघ्या आठ महिन्यांत अनेक जलसाठे कोरडेठाक पडल्याने आज नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी विकत किंवा भटकंती करण्याची वेळ आली आहे.मागच्या वर्षी अतिवृष्टीमुळे जून महिन्यात पाऊस मुबलक झाला,तलाव भरले;पण पाण्याचे नियोजन मात्र कुठेच दिसले नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होताना दिसत आहे.
गतवर्षी जूनमध्येच तालुक्यातील जवळपास सर्वच्या सर्व तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहत होते. शेतकऱ्यांसह नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान होते.यंदा पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होणार नाही,असा विश्वास निर्माण झाला होता.
मात्र,जलसाठ्याचे योग्य नियोजन,उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर, पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक साठा राखून ठेवणे आणि भविष्यातील परिस्थितीचा अंदाज घेणे या बाबींमध्ये प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप होत आहे.परिणामी, काही महिन्यांतच जलसाठे झपाट्याने कमी झाले आणि आता पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू झाली आहे.
आष्टी तालुक्यातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी एखादा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर त्यातील पाण्याचे योग्य व्यवस्थापन झाल्यास किमान दोन वर्षे पाणीटंचाईची तीव्रता जाणवत नव्हती. यंदा मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.अवघ्या आठ महिन्यांत तलाव कोरडे पडत असतील,तर पाण्याचे नियोजन नेमके कुठे चुकले?उपलब्ध जलसाठ्याचा वापर कशा पद्धतीने झाला? पिण्याच्या पाण्यासाठी राखीव साठ्याचे व्यवस्थापन करण्यात आले का? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने जनतेसमोर मांडणे गरजेचे आहे.
तालुक्यात पाणीटंचाई निर्माण होण्यास पाटबंधारे विभागाच्या नियोजनाचा अभाव कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. पावसाळ्यात जलसाठे भरल्यानंतर त्यांचे वर्षभराचे नियोजन करणे,पाण्याची उपलब्धता आणि गरज यांचा ताळमेळ राखणे,तसेच उन्हाळ्यापूर्वी संभाव्य टंचाईची पूर्वतयारी करणे अपेक्षित असते. मात्र,जलसाठे भरल्यानंतर प्रशासनाने पुढील काळातील पाणी व्यवस्थापनाकडे गांभीर्याने पाहिले नाही का,असा सवाल आता उपस्थित होत आहे.
एकीकडे जलसंधारण,बंधारे, तलाव दुरुस्ती आणि पाणी अडविण्यासाठी विविध योजना राबविण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करत आहेत तर दुसरीकडे पावसाळ्यात भरलेले तलाव काही महिन्यांतच कोरडे पडत असतील, तर या योजनांचा प्रत्यक्ष फायदा किती झाला, याचे मूल्यमापन करण्याची वेळ आली आहे.
पाणी हा केवळ शेतीचा विषय नसून नागरिकांच्या जगण्याशी निगडित मूलभूत प्रश्न आहे. त्यामुळे जलसाठा उपलब्ध असताना भविष्यातील पाणीटंचाईचा अंदाज घेऊन नियोजन करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.
महाराष्ट्रात पावसाने ओढ दिल्यामुळे अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची भीषण परिस्थिती निर्माण झाली असून,ग्रामीण भागात नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी तीव्र वणवण करावी लागत आहे.अनेक गावे आणि वाड्या-वस्त्यां वर पिण्याच्या पाण्याचा एकमेव आधार आता शासकीय व खाजगी पाण्याचे टँकर्स हाच उरला आहे.तलाव भरलेले असताना अवघ्या आठ महिन्यांत पाणीटंचाई निर्माण झाली. त्यामुळे पाणीटंचाई कृत्रिमरीत्या निर्माण करून टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठ्याला चालना देण्यात आली का?असा संशय नागरिकांकडून व्यक्त होत आहे. टंचाई जाहीर झाल्यानंतर टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी होणारा खर्च,मंजूर टँकरची संख्या, प्रत्यक्ष फेऱ्या आणि त्यावरील देयके याचा प्रशासनाने पारदर्शक हिशेब जनतेसमोर मांडावा.टँकर माफियाला फायदा व्हावा म्हणून पाण्याचे नियोजन जाणीवपूर्वक बिघडवले का?या प्रश्नाचे उत्तर प्रशासनाने द्यावे.
पाऊस असताना नियोजन नाही आणि पाणी संपल्यानंतर उपाययोजना—हा कारभाराचा नेमका कोणता पॅटर्न? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.
गतवर्षी जूनमध्ये तालुक्यातील प्रमुख तलावांमध्ये किती पाणीसाठा होता, त्यानंतर महिनानिहाय किती पाणी उपलब्ध होते, त्याचा किती वापर झाला आणि सध्या किती पाणीसाठा शिल्लक आहे, याचा संपूर्ण अहवाल प्रशासनाने जाहीर करावा, अशी मागणी होत आहे. व तलाव भरलेले असताना पाणीटंचाईची बीजे कुठे पेरली गेली,याचा शोध घेऊन जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही नागरिकांतून होत आहे. तलाव भरून वाहत होते;आज नागरिक पाण्यासाठी वणवण करत आहेत.याला जबाबदार कोण? हा प्रश्न आता आष्टी तालुक्यातील जनतेला पडला आहे.