Accident News file photo
बीड

Beed Accident | पेरणीचे साहित्य आणायला गेलेल्या तरुणाचा भरधाव ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू; चुलत भाऊ गंभीर

मिरजगावात साहित्य न मिळाल्याने अहिल्यानगरकडे निघाले होते; वाळुंज पारगाव शिवारातील भीषण अपघाताने केरूळ गावावर शोककळा

पुढारी वृत्तसेवा

Ahilyanagar Solapur Road Mishap

कडा : शेतातील पेरणीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या आष्टी तालुक्यातील दोन चुलत भावांवर रविवारी काळाने घाला घातला. अहिल्यानगर–सोलापूर महामार्गावरील वाळुंज पारगाव शिवारात भरधाव ट्रकने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने वेदांत अशोक फंड (वय २०, रा. केरूळ, ता. आष्टी) याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा चुलत भाऊ ऋषिकेश बाबासाहेब फंड (वय २३) गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

माहितीनुसार, वेदांत आणि ऋषिकेश हे दोघे रविवारी दुपारी शेतातील पेरणीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी प्रथम मिरजगाव येथे गेले होते. मात्र, तेथे आवश्यक साहित्य उपलब्ध न झाल्याने ते दुचाकीवरून अहिल्यानगरकडे निघाले. वाळुंज पारगाव शिवारात पोहोचताच समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि वेदांतचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी ऋषिकेशला तातडीने रुग्णवाहिकेद्वारे अहिल्यानगर येथील रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

एकुलत्या एक मुलाच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर

मृत वेदांत फंड हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. शेतीच्या कामात तो कुटुंबाला हातभार लावत होता. त्याच्या अकाली निधनाने फंड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण केरूळ गावावर शोककळा पसरली आहे. रविवारी रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वृद्ध आई-वडील आणि बहिणीचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT