बीड

Beed News : आष्टीच्या सुपुत्राची गगनभरारी! प्रथमेश घोडकेची अवघ्या २४ व्या वर्षी 'कृषी उपसंचालक'पदी निवड

पुढारी वृत्तसेवा

Beed Ashti Prathamesh Ghodke Agriculture Deputy Director

आष्टी : जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर एखादे ध्येय निश्चित केले तर आकाशही ठेंगणे होते, हे आष्टीच्या प्रथमेश बाळासाहेब घोडके याने सिद्ध करून दाखवले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या परीक्षेत प्रथमेशने घवघवीत यश संपादन करत 'कृषी उपसंचालक' (वर्ग-१) या पदावर झेप घेतली आहे. अवघ्या २४ व्या वर्षी मिळालेल्या या यशामुळे आष्टी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून संपूर्ण जिल्ह्यातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी

आष्टीचे नगरसेवक बाळासाहेब घोडके यांचे सूपुत्र असलेल्या प्रथमेशने आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण स्थानिक पंडित नेहरू विद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर कोल्हापूरच्या राजर्षी शाहू कृषी महाविद्यालयातून त्यांनी कृषी पदवी प्राप्त केली. विशेष म्हणजे, राहुरी येथे एमएससीचे (M.Sc.) शिक्षण घेत असतानाच त्यांनी एमपीएससीचा अभ्यास सुरू ठेवला आणि कोणत्याही अडथळ्याविना पहिल्याच प्रयत्नात वर्ग-१ अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले.

बळीराजाची सेवा करण्याचे स्वप्न

ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण असलेल्या प्रथमेशने प्रशासकीय सेवेत जाताना जाणीवपूर्वक कृषी क्षेत्राची निवड केली. "शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला प्रशासकीय अधिकारी बनायचे होते," असे प्रथमेशने यावेळी आवर्जून सांगितले. सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

"समाजसेवेचा जो वारसा आम्ही जपला, तोच वारसा आता प्रथमेश प्रशासकीय अधिकारी म्हणून पुढे नेईल, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे."
बाळासाहेब घोडके (नगरसेवक व वडील)

आष्टी तालुक्यात जल्लोषाचे वातावरण

प्रथमेशच्या निवडीचे वृत्त समजताच आष्टी परिसरात आनंदाला उधाण आले आहे. राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांनी घोडके कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. आमदार सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे, साहेबराव दरेकर, बाळासाहेब आजबे, सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, सुखदेव पोकळे, नगराध्यक्ष जिया बेग, सभापती बद्रीनाथ जगताप, उपनगराध्यक्ष शैलेश सहस्रबुद्धे, माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे, रमजान शेठ तांबोळी यांच्यासह अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष व सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT